श्री स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेचे आयोजन
बांदा ता.१७: वाफोली येथील श्री स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेचे सोळावे रंगावली प्रदर्शन २ ते ८ अॉक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट येथे होत आहे.जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते रविवारी वाफोली येथे या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकांचे अनावरण करण्यात आले. तसेच सिंधुदुर्गातील सर्व होतकरू कलाकारांना शुभेच्छा देण्यात आल्या.
वाफोली येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस. बी. पोलाजी यांच्या श्री स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेचे १६ वे रंगावली प्रदर्शन दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त पत्रकांचे अनावरण प्रमोद कामत व बांदा प्रभारी सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी एस. बी.पोलाजी, पं.स.सदस्या अक्षया खडपे,वाफोली उपसरपंच अश्विनी गवस, डेगवे उपसरपंच प्रविण देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, वाफोली ग्रा. पं. सदस्या वृषाली गवस, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, बांदा माजी सरपंच दीपक सावंत, विलास गवस, विनेश गवस, मिलींद तर्पे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमोद कामत म्हणाले, सिंधुदुर्गातील कलाकारांचे दिल्लीत रंगावली प्रदर्शन होणे आमच्यासाठी भूषणावह आहे. यापुर्वीही चित्रकार पोलाजी सरांनी ग्रामीण भागातील कलाकारांना आपली कला देश विदेशात सादर करण्याची संधी दिली आहे. या प्रदर्शनातून सर्व कलाकारांनी सर्वोत्तम कला सादर करून जिल्ह्याचे नाव मोठे करावे असे आवाहन केले. अक्रम खान म्हणाले, आपल्या जिल्ह्यात कलाकारांची खाण आहे. मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही ही शोकांतिका आहे. पोलाजी सरांनी मात्र रंगावली कलाकारांसाठी कायमच व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना उत्तेजन दिले आहे.
दिल्ली येथील या रंगावली प्रदर्शनात रघुनाथ कुडपकर, अजय खानोलकर, साई पारकर, मकरंद मांजरेकर, विनायक मांजरेकर, रविकिरण शिरवलकर, शंकर राणे, अक्षय सावंत व वरूण भालेकर हे कलाकार सहभागी होणार आहेत. ते लवकरच दिल्ली येथे रवाना होणार असून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन एस. बी.पोलाजी यांनी केले.