गुरुदास गवंडे; धीरज परब यांना ताब्यात घेण्याचे कृत्य चुकीचे…
सावंतवाडी ता.१७: मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना पोलिसांना ताब्यात घ्यायला लावणाऱ्या भाजप सरकारचा मनसेच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत.सरकारने याआधी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले असते,तर आज मुख्यमंत्र्यावर अशा यात्रा काढण्याची वेळच आली नसती,अशी टीका मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी आज येथे दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्त कणकवलीत आज भाजपच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर श्री.परब यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले.मात्र हा सर्व प्रकार चुकीचा आहे,ही सरकारची एकतर्फी मनमानी आहे,त्यामुळे या कृत्याचा आम्ही मनसेच्या वतीने निषेध करत आहोत.सरकारने खरोखरच जनतेचे प्रश्न सोडवले असते,बेरोजगारी हटवली असती आणि सिंधुदुर्गातील प्रकल्पांना प्राधान्य दिले असते तर आज ही वेळ मुख्यमंत्र्यावर आली नसती.या सरकारबाबत आता येथील नागरिकांमध्ये सुद्धा नाराजी पसरली आहे त्यामुळे अशा यात्रांचा आता काही फायदा होणार नाही.असेही श्री.गवंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.