कणकवली , ता. १७ : भाजपकडून आमदार नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी राणे कणकवलीत आले होते. यावेळी कणकवली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयासमोर राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी बातचीत केली.
भाजप प्रवेशाबाबत श्री. राणे म्हणाले, भाजपमध्ये माझा लवकरच प्रवेश होईल. हा कार्यक्रम मुंबईतच होईल. मीच तशी इच्छा व्यक्त केलेली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कणकवली विधानसभेची जागा आमदार नितेश राणे यालाच मिळेल असाही दावा श्री. राणे यांनी यावेळी केला.
आज मुख्यमंत्री कणकवलीत एक वाजता सभेसाठी येणार होते. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास ते कणकवलीत दाखल झाले. मात्र दस्तुरखुद्द नारायण राणे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे हे शहरातील स्वाभिमानच्या संपर्क कार्यालयात दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या यात्रेची प्रतीक्षा करत होते