त्या’ ट्रॉलरवरील मासळीचा पावणे दोन लाखाचा लिलाव…

245
2
Google search engine
Google search engine
Google search engine

यापुढेही घुसखोरी सुरू राहिल्यास ट्रॉलर सील करू ; आम. वैभव नाईक यांचा इशारा…

मालवण, ता. १७ : गुजरात येथील तीन हायस्पीड ट्रॉलर काल समुद्रात धडक कारवाई करत पकडण्यात आले. या ट्रॉलरवर सापडलेल्या मासळीचा लिलाव आज करण्यात आला. तिन्ही ट्रॉलरवरील मासळीचा १ लाख ७९ हजार ६८० रुपयांचा लिलाव करण्यात आला. संबंधितांवर कडक कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रतिवेदन दिले जाणार असल्याची माहिती सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी दिली.
दरम्यान गेले काही दिवस सातत्याने जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्संनी हैदोस घातला आहे. मासळीची लूट सुरू ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईचे पाऊल उचलले आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांना दिले आहेत. यापुढेही घुसखोरी सुरू राहिल्यास त्या बोटी सील करण्याची कार्यवाहीही केली जाईल असा इशारा आमदार नाईक यांनी दिला.
परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासळीची लूट करण्याबरोबरच स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यांची तोड केली जात होती. त्यामुळे याप्रश्‍नी आक्रमक बनलेले आमदार वैभव नाईक हे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेश परब, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, पोलिस कर्मचार्‍यांसह गस्तीनौकेद्वारे रात्री समुद्रात कारवाईसाठी रवाना झाले. समुद्र खवळलेला तसेच वार्‍याचा जोरही कायम असतानाही गस्तीनौकेद्वारे हायस्पीड ट्रॉलर्सचा थरारक पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या धडक कारवाईत गुजरात येथील तीन ट्रॉलर्स पकडण्यात यश आले.
रात्री उशिरा हे तिन्ही ट्रॉलर येथील बंदरात आणण्यात आले. या ट्रॉलरवरील खलाशी तसेच महत्वाची कागदपत्रे मत्स्यव्यवसायच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतली. या तिन्ही ट्रॉलरवरील मासळीचा आज सकाळी मासळी मंडईनजीक लिलाव करण्यात आला. यात मा भगवती वादवा कृपा आयएनडी-जीजे-११ एमएम-३०५२ या ट्रॉलरवर ४९ हजार २०० रुपयांची मासळी आढळली. नारायणी-१२ आयएनडी-जीजे- एमएम-१२४६५ या ट्रॉलरवर ७२ हजार ८४० रुपयांची मासळी आढळली. राम बलराम आयएनडी- जीजे-११- एमएम-१२७८३ या ट्रॉलरवर ५७ हजार ६४० रुपयांची मासळी आढळली. याप्रकरणी या तिन्ही ट्रॉलर्संच्या मालकांविरोधात तहसीलदारांकडे कारवाईसाठी प्रतिवेदन सादर केले जाणार असल्याचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. वस्त यांनी स्पष्ट केले. परराज्यातील ट्रॉलर्सच्या घुसखोरीविरोधात स्थानिक मच्छीमारांमारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई मोहिम हाती घेतली आहे. यापुढेही गस्तीनौकेद्वारे कडक कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे. यासाठी पोलिसांनीही सहकार्य करावे असे आवाहन श्री. वस्त यांनी यावेळी केले.
परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी होत असताना कारवाईसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी मत्स्यव्यवसाय विभागाकडे उपलब्ध नव्हते. मात्र मत्स्य व्यवसाय विभागातील तीन रिक्तपदे भरण्यात आली असून उर्वरित एक पदही येत्या दोन-चार दिवसात भरण्यात येईल. परराज्यातील ट्रॉलर्सच्या घुसखोरीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने यापुढेही धडक कारवाई मोहिम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरही परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू राहिल्यास त्यांच्यावर कडक कारवाईबरोबरच ते ट्रॉलर कायमस्वरूपी सील कसे करता येतील यादृष्टीनेही प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.

\