पाच पारंपरिक मच्छीमार स्थानबद्ध ; मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याचे वाईट वाटले…

2

महेंद्र पराडकर ; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी भाजप पदाधिकाऱ्यांनी ठाम राहावे…

मालवण, ता. १७ : फाटलेल्या जाळ्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असे पारंपरिक मच्छीमारांनी जाहीर केल्याने मुख्यमंत्र्यांच्या कणकवली दौर्‍यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर येथील पाच पारंपरिक मच्छीमारांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेत स्थानबद्ध केले. आमदारांसमवेत दोन प्रतिनिधींची भेट घडविण्याचे पोलिस निरीक्षकांनी आश्‍वासन देऊनही त्याची कार्यवाही न झाल्याने या पारंपरिक मच्छीमारांनी पोलिस ठाण्यातच ठाण मांडण्याचा निर्णय घेतला. अखेर सायंकाळी पोलिसांकडून मिळालेल्या स्पष्टीकरणानंतर ते माघारी परतले.
परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्या तोडल्या जात असल्याने याप्रश्‍नी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी फाटलेल्या जाळ्या घेऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या पार्श्‍वभूमीवर आज येथील पोलिसांनी मुंबई पोलिस अ‍ॅक्ट ६९ अन्वये मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर, मिथुन मालंडकर, भाऊ मोरजे, संजय जामसंडेकर, वसंत गावकर या पाच जणांना सकाळी नऊ वाजता स्थानबद्ध करून पोलिस ठाण्यात नेले. मुख्यमंत्र्यांची भेट आमदारांसमवेत घडवून आणली जाईल असा शब्द दिल्यानंतर त्याची कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यत पोलिस ठाण्यातच ठाण मांडून बसण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला असल्याचे मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल आम्हाला काहीच म्हणायचे नाहीय. त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले. परंतु आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही याचेच खुप वाईट वाटले. खरेतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून मत्स्यदुष्काळाची मागणी करणार होतो. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी पर्ससीन मासेमारीच्या अतिरेकामुळे निर्माण झालेल्या मत्स्यदुष्काळाकडे लक्ष वेधणार होतो. ५ फेब्रुवारी २०१६ रोजी पारित केलेल्या अधिसूचनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही द्यायच्या होत्या. पण तसे होऊ शकले नाही. पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनधिकृत पर्ससीन मासेमारी, परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स व एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे निर्माण झालेल्या मत्स्यदुष्काळाच्या प्रश्नावर वाच्यता केली. मुख्यमंत्री पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेशी विपर्यास्त भुमिका न घेता पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे. आजही परराज्यातील ट्रॉलर्सचा धुडगूस कायम आहे. त्यांना रोखून दाखवावे, असे श्री. पराडकर यांनी सांगितले.

13

4