Thursday, November 7, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासंतुलित आहार घेत महिलांनी रक्ताक्षयाच्या विळख्यातून बाहेर पडावे...

संतुलित आहार घेत महिलांनी रक्ताक्षयाच्या विळख्यातून बाहेर पडावे…

संतुलित आहार घेत महिलांनी रक्ताक्षयाच्या विळख्यातून बाहेर पडावे…

के. मंजुलक्ष्मी ; किर्लोस येथे पोषणमूल्य आधारित परसबाग शेती कार्यशाळा संपन्न…

मालवण, ता. १७ : महिलांनी संतुलित आहार घेऊन रक्ताक्षयासारख्या आजाराच्या विळख्यातून बाहेर पडावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज किर्लोस येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, किर्लोस संचालित कृषि विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग आणि एम. एस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन चेन्नई, युनिसेफ यांच्या सयुंक्त विद्यमाने “पोषणमूल्य आधारित परसबाग शेती” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, डॉ. रत्नराजे थर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
के. मंजुलक्ष्मी यांनी मार्गदर्शन करताना कुपोषणावर आधारित रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी घर, शाळा, अंगणवाडी अशा ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने पोषणमुक्त परसबाग विकसित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. या उपक्रमाला प्रशासनाकडून लागणारी योग्य ती मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. रासायनिक खते किंवा कीटकनाशके आरोग्यासाठी धोकादायक आहेत. आरोग्यदायी अन्ननिर्मितीसाठी कृषि विज्ञान केंद्राद्वारे राबविण्यात येणारे नैसर्गिक शेती पद्धती प्रयोग नावीन्यपूर्ण आहेत. महिलांनी संतुलित आहार घेऊन रक्ताक्षयासारख्या आजाराच्या विळख्यातून बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले.
कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्राद्वारे पोषणमुल्य आधारित परसबाग शेती हा उपक्रम चालू आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार कोणत्याही देशमध्ये ४० % च्या वर रक्ताक्षयाचे प्रमाण असणे हे गंभीर समस्येचे घोतक आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये स्त्रियांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त आहे. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्ताक्षय हा अपंगत्वाचे एक प्रमुख कारण आहे. गरोदरपणात रक्ताक्षय असेल तर त्याचा परिणाम जन्माला येणार्‍या बाळावर होतो. विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राद्वारे नैसर्गिक शेतीचे प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. कृषि विज्ञान केंद्राद्वारे शेतकर्‍यांना पोषणमुल्य आधारित परसबाग शेतीची प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
कृषि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व सरपंच प्रदीप सावंत यांनी कृषि विज्ञान केंद्राद्वारे सुरुवातीच्या मालवण तालुक्यातील १५ गावांच्या प्राथमिक शाळामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून गावातील १०० महिलांना कुक्कुट पालनसाठी पिल्ले देण्यात येणार आहेत. त्यातून निर्माण होणार्‍या अंडी व मांसपासून आहारातील प्रथिनांची गरज भागवता येईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मंदार गीते व उपाध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या तांत्रिक मार्गदर्शनसाठी सहायक ट्रस्ट मुंबई आणि आयोजनासाठी प्राथमिक शाळा किर्लोस यांचे सहकार्य लाभले. उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन सहायक ट्रस्टच्या शास्त्रज्ञा डॉ. रत्नराजे थर यांनी केले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, सचिव दीनानाथ वेरणेकर, संचालक सुशांत नाईक, तुषार देसाई उपस्थित होते. तसेच प्राथमिक शाळांचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, सरपंच, शालेय समिति अध्यक्ष, शेतकरी, महिला, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व अधिकारी कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ३०० पेक्षा जास्त लोकांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सूत्रसंचालन, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत यांनी केले.

डॉ. मंदार गीते
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषि विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments