नारायण राणेंना “तो” अधिकार नाही; प्रमोद जठार यांची माहिती…
कणकवली,ता.१८ : येथील विधानसभेची भाजपची उमेदवारी नितेश राणे यांना जाहीर झालेली नाही.पक्षाने त्याबाबतचा निर्णय अध्याप घेतलेला नाही.तसेच विधानसभेचा उमेदवार नारायण राणे ठरवू शकत नाहीत.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष,प्रदेशाध्यक्ष हेच उमेदवार जाहीर करू शकतात,अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज दिली.तसेच खासदार नारायण राणे यांनी आधी नाणार बाबतची आपली भूमिका जाहीर करावी.त्यांचा नाणार रिफायनरीला पाठिंबा असेल आणि भाजपची ध्येयधोरणे त्यांना पटत असतील तरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल,असेही श्री.जठार म्हणाले.
येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी भाजप नेते अतुल रावराणे,प्रदेश चिटणीस राजन तेली आदी उपस्थित होते.
श्री.जठार म्हणाले,माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी कणकवली मतदारसंघात कमळ या निशाणी वर नितेश राणे हे निवडणूक लढवतील असे काल जाहीर केले.मात्र त्यांची वैयक्तिक भूमिका आहे.पक्षाने अद्यापही उमेदवारांचे निश्चिती केलेली नाही.कणकवली मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यामध्ये आता नितेश राणे यांची भर पडली आहे.मात्र राणे यांचा भाजप मधील पक्षप्रवेश सध्या व्हायचा आहे.
राणेंनी आधी भाजपची ध्येयधोरणे जाणून घ्यावीत.तसेच नाणार प्रकल्प बाबतची भाजपची भूमिका त्यांना मान्य आहे का?नाणार प्रकल्पाला ते पाठिंबा देणार का? हे आधी त्यांनी जाहीर करावे. भाजपची ध्येयधोरणे त्यांना पटत असतील तरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. ते जर नाणारला पाठिंबा देत असतील तर त्यांच्या भाजप प्रवेशासाठी आम्ही प्रयत्न करू असे श्री जठार म्हणाले.
राणेंचा प्रवेश प्रदेश कोअर कमिटी ठरवेल
खासदार नारायण राणे हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेश याबाबतचा निर्णय भाजपची कोअर कमिटी घेईल आणि कोअर कमिटी जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल असेही प्रमोद जठार म्हणाले.