दुकान मालकाची पोलिसात धाव; घटनास्थळी पोलिस दाखल…
सावंतवाडी ता.१८: नगरपालिकेच्या इंदिरा संकुलात एका कपड्याच्या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.ही घटना आज दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास तेथीलच एका दुकान व्यावसायिकाच्या निदर्शनास आली.दरम्यान संबंधित दुकान मालकाने सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधित दुकान काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बंद करून दुकान मालक घरी परतले.दरम्यान आज त्यांनी दुकान बंद ठेवले होते.मात्र दुकानातील कपडे दुकाना बाहेर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले तेथीलच काही व्यवसायिकांच्या निदर्शनास आले.याबाबत त्यांनी दुकान मालकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच दुकान मालकाने तातडीने धाव घेऊन दुकानाची पाहणी केली.दरम्यान दुकान उघडून पाहिले असता,आतील सामान चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला.अधिक तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते घटनास्थळी दाखल झाले आहेत.याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे.