दीपक केसरकर;आडाळीत औद्योगिक वसाहतीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन…
सिंधुदुर्गनगरी ता.१८: जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या गावात व जिल्ह्यात हक्काचा रोजगार मिळाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील औद्योगिक वसाहतीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या श्रीमती देसाई, गणेश गवस, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे कार्यकारी अभियंता परशुराम करावडे, उप अभियंता अविनाश रेवणकर, क्षेत्र व्यवस्थापक हरिषचंद्र वेंगुर्लेकर, माहिती व जनसंपर्क विभागीचे निवृत्त उपसंचालक सतीश लळीत आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, बांदा येथे चष्म्याचा कारखाना उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये किमान 500 युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. तर सावंतवाडी येथे सेट टॉप बॉक्स निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये 1300 लोकांना रोजगार मिळणार आहे. यासाठीचे प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे. तसेच रोजगारासोबतच शेतकऱ्यांचेही कल्याण होणे गरजेजे आहे. त्यासाठी शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनेक योजना आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येकासाठी कोणती ना कोणती शासकीय योजना तयार आहे. या सर्व योजनांचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यात वसतीगृह उभारण्यात येत आहेत. मुले शिकली तरच जिल्ह्याची प्रगती साधली जाईल यासाठी प्रत्येकांने उच्च शिक्षण घ्यावे तसेच स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून उच्च पदी नोकरी करावी यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आडाळी एमआयडीसीच्या पाणी पुरवठा योजनेच्या दीड कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच 22 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांनाही लवकरच सुरूवत होत असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता परशुराम करावडे यांनी सांगितले. तसेच यावेळी आडाळी या क वर्ग दर्जा मिळालेल्या पर्यटन स्थळाच्या विविध विकासकामांचा शुभारंभही पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तावित कार्यकारी अभियंता परशुराम करावडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन उप अभियंता अविनाश रेवणकर यांनी केले. सूत्र संचालन माहिती विभागाचे निवृत्त उपसंचालक सतीश लळीत यांनी केले. यावेळी आडाळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
• सोबत फोटो जोडला आहे.
00000