लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करून मुख्यमंत्र्यांनी काय साधले

111
2
Google search engine
Google search engine
Google search engine

परशुराम उपरकर : रोजगाराचे आमिष दाखवून प्रदूषणकारी प्रकल्प

कणकवली, ता.१८: सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी महाजनादेश यात्रा काढल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र याच यात्रेत निवेदने देण्यासाठी येणार्‍या लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करून मुख्यमंत्र्यांनी काय साधले असा प्रश्‍न मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज केला.
येथील मनसे संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर उपस्थित होते. श्री.उपरकर म्हणाले, परप्रांतीय ट्रॉलर्सचे अतिक्रमण, एलईडी फिशिंग सह अनेक मुद्दयांवरील निवेदने देण्यासाठी लोकप्रतिनिधींना पास देण्यात आले होते. मात्र हे पास रद्द करण्यात आले. एवढेच नव्हे तर अनेक लोकप्रतिनिधींना, मच्छीमार प्रतिनिधींना भल्या पहाटे स्थानबद्ध करण्यात आले. अनेकांची सभामंडपातून उचलबांगडी करण्यात आली.
ते म्हणाले, पर्ससीन आणि एलईडी फिशिंगवर बंदीचा प्रश्‍न सोडवला असे मुख्यमंत्री कणकवलीच्या सभेत सांगतात. तर त्याच दिवशी कुडाळ-मालवणचे आमदार समुद्रात जाऊन नांगरून ठेवलेल्या पर्ससीन बोटी पकडून आणतात. याचाच अर्थ पर्ससीन, एलईडी फिशींगबाबत मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही असा होतो. काथ्या उद्योगातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पण काथ्या उद्योगातून एकही रोजगार निर्माण झालेला नाही. तशी माहिती देखील प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना दिलेली नाही ही दुदैवाची बाब आहे.
नाणार येथील प्रकल्पात सौदी या देशातील आरामको या कंपनीची भागीदारी आहे. आरामको कंपनीच्या ऑइल प्लांटवर नुकताच ड्रोनद्वारे बॉम्ब हल्ला झाला आणि तेथील तेल उत्पादन थांबवावे लागले आहे. असा प्रदूषणकारी उद्योग नाणार येथे आणला जातोय. या प्रकल्पात लाखो रोजगार संधी मिळणार असे सांगून तरुणांची दिशाभूल देखील केली असल्याचा आरोप श्री.उपरकर यांनी केला.
मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेमधील आरास बसला वीज वाहिन्यांचा अडथळा होणार असल्याने त्या काढून टाकण्यात आल्या. यामुळे महाजनादेश यात्रेच्या गावांमध्ये दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिला. महाजनादेश यात्रेसाठी जनतेला अंधारात ठेवण्याचा पराक्रम देखील मुख्यमंत्र्यांनी केला असल्याचे श्री.उपरकर म्हणाले.

\