आम. वैभव नाईक : चांदा ते बांदा योजनेंतर्गत होणार कार्यवाही…
मालवण, ता. १८ : चांदा ते बांदा योजनेंतर्गत बांदा येथे मासळीचे आंतरराज्य होलसेल मार्केट येत्या काळात उभारण्यात येईल. यासाठी २ कोटी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. शासन व ग्रामपंचायतीकडून आवश्यक जागा उपलब्ध होईल असे आमदार वैभव नाईक यांनी येथे स्पष्ट केले.
चांदा ते बांदा योजनेतंर्गत तालुक्यातील मच्छीमारांना इन्सुलेटेड वाहन, आऊटबोट इंजिन, जाळ्या ७५ टक्के अनुदानावर मंजूर झाल्या आहेत. यात आज सायंकाळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात इन्सुलेटेड वाहन लाभार्थ्याला देण्यात आले. इन्सुलेटेड वाहनांच्या २८ प्रस्तावांना, आऊटबोट इंजिनधारकांना २३७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मंजूर प्रस्तावांची पत्रे आज संबंधित लाभार्थ्यांना आमदार नाईक यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी नितीन वाळके, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुडाळकर, पंकज सादये, सेजल परब, नंदा सारंग, पूजा तोंडवळकर, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, राजा शंकरदास, स्वप्नील आचरेकर, तपस्वी मयेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.
शेतकरी, महिला, मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी चार वर्षापूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा ही योजना तयार केली. मच्छीमारांकडून या योजनेला सुरवातीला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शिवसेना पदाधिकार्यांनी मच्छीमारांना भेडसावणार्या त्रुटींची माहिती घेतली. यात बर्याच मच्छीमारांकडे आऊटबोट इंजिने नसल्याचे दिसून आले. त्यानुसार अनेक मच्छीमारांनी प्रस्ताव सादर केले. त्यानुसार या वर्षात ७५ टक्के अनुदान देत २३७ लाभार्थ्यांना आऊटबोट इंजिन उपलब्ध करून दिले आहे. गतवर्षी गोवा सरकारने मत्स्यबंदी केली होती. याप्रश्नी आम्ही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यात जिल्ह्यातील मच्छीव्यापार्यांना इन्सुलेटेड वाहने उपलब्ध करून देण्यासाठी चांदा ते बांदा योजनेतंर्गत प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार इन्सुलेटेड वाहनांचे २८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत आपले आर्थिक उत्पन्न कसे वाढेल यादृष्टीकोनातून प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार नाईक यांनी केले.
काहींनी बांदा येथे मासळी मंडईसाठी जागेची पाहणी केली होती. मात्र प्रत्यक्षात काही केले नाही. मात्र जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी पालकमंत्री केसरकर व मी प्रयत्न केले. त्यानुसार बांदा येथे मासळीचे आंतरराज्य होलसेल मार्केट उभारण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ३० लाखाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या मार्केटसाठी शासन व बांदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतली जाणार आहे. हे मार्केट झाल्यास जिल्ह्यातील मच्छीमारांच्या मासळीला चांगला दरही मिळेल असा विश्वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. चांदा ते बांदा या योजनेतंर्गत येत्या काळात रापणकर मच्छीमारांनाही अनुदान दिले जाणार आहे. या योजनेतंर्गत मच्छीमारांना चांगला लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.