ओरोस फाटा येथे रोखला महामार्ग
350 आशांना घेतले ताब्यात
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स यूनियनच्यावतीने बुधवारी दुपारी ओरोस फाटा येथे महामार्ग रोखून धरत जेल भरो आंदोलन केले. दरम्यान यावेळी सुमारे ३५० आशा वर्कर्सना ताब्यात घेण्यात आले.
आशा व गटप्रवर्तक यांना देण्यात येणारे मानधन हे अत्यल्प आहे. त्यामुळे या मानधनात वाढ करण्यात यावी, राष्ट्रिय आरोग्य अभियान कायम करन्यात यावे, आशाना आरोग्य सेवेत कायम करावे, खासगीकरण बंद करावे या मागणीसाथी आशा व गटप्रवर्तक यांच्याकडून अनेक वेळा मोर्चा, धरणे, जेलभरो आदि आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांची दखल घेत आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात तिप्पट वाढ करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जात नाही. त्यामुळे मानधन वाढीचा शासन निर्णय निघत नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्याकड़े शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधन्यसाठी आज (बुधवारी) दुपारी पावणे दोन वाजता सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन (सीटू) शी सलग्न असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स यूनियनच्या वतीने ओरोस फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको करत जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना धुरी, सचिव कॉ. विजयाराणी पाटिल यांच्यासह ४०० हुन अधिक आशा कर्मचारी उपस्थित होत्या.
महामार्गावर वाहनांच्या रांगा
आपल्या न्याय मागण्यांसाठी आशा वर्कर्स यूनियनने आज ओरोस फाटा येथे विविध गगनभेदी घोषणा देत रास्ता रोको केले. महामार्गावर आशा कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महामार्ग काही काळ ठप्प झाला होता. तर त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या.