शिवसेनेने श्रेयवादावरून राजकारण करू नये…
मनोज उगवेकर : गावाच्या विकासासाठी आमचे नेहमीच सहकार्य…
वेंगुर्ले, ता.१८ : शिरोडा गावातील मंजूर विकास कामांची भूमीपीजने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते पार पडली. परंतु गावातील या कार्यक्रमाला सरपंच या नात्यानेही मला तसेच सदस्यांनाही आमंत्रित केले नाही. यामुळे मी नाराज झालो आहे. शिवसेनेने श्रेयवादावरून राजकारण करू नये. आम्हीही युतीमधील सहकारी आहोत,हे विसरु नये. गावातील विकासासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील अशी भूमिका शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी व्यक्त केली आहे.
शिरोडा ग्रामपंचायत येथील
२५/१५ मधून खाजनभाटी – काळोबा मंदिर रस्ता तसेच हरीजनवाडी येथील मंजूर रस्त्याचे भूमिपूजन संजय पडते यांच्या हस्ते काल मंगळवार १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता घाई गडबडीत करण्यात आले.
सदर भूमिपूजन कार्यक्रमा साठी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना तसेच सरपंच म्हणून मलाही कुठल्याही प्रकारची कल्पना कींवा निमंत्रण दिले नाही. या बद्दल मी नाराजी व्यक्त करीत आहे. आम्ही सदस्यांच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे गावातील कामे मंजूर होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावा करत होतो, आणि प्रत्यक्षात ही विकास कामे मंजूर झाल्यानन्तर भूमीपूजनाचे श्रेय मिळण्यासाठी होत असलेले राजकारण पाहून वाईट वाटत.
परंतु शिरोडा गावातील काम मंजूर करून दिल्या बद्दल पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांचे मी आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यालाच युतीधर्म म्हणावा का ?
शिरोड्यातील या भूमिपूजन कार्यक्रमा नंतर आपण शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याशी फोन वरून बोललो असता त्यांनी ही कामे पालकमंत्री केसरकर यांनी मंजूर केलेली असल्याने शिवसेनेच्या वतीने आपण भूमिपूजन केले व शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्याना या कार्यक्रमाची पूर्व कल्पना ( माहिती) दिली असल्याचे सांगितले. असे असेल तर आम्ही यालाच युतीधर्म म्हणाव का असा प्रश्न उगवेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणुकीच्या वेळीच फक्त युतीधर्म आठवतो का हा सुद्धा प्रश्न आहे असेही त्यांनी म्हटले आहे.