आमदार नीतेश राणेंची ग्वाही ः
कणकवली, ता.१९:नाणार प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध होता. लोकांना हा प्रकल्प नको होता. जनतेची ही भूमिका आम्ही आमच्या माध्यमातून मांडली. पण आता जनतेची भूमिका वेगळी असेल. तसेच लोकांना काही वेगळं हवं असेल तर त्याबाबत आम्ही पुन्हा स्थानिकांशी चर्चा करू आणि नाणार बाबतची आमची भूमिका जाहीर करू अशी ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी आज ब्रेकिंग मालवणीशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा राजापूर, रत्नागिरीत आल्यानंतर स्थानिकांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे सांगितले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही रिफायनरी प्रकल्प जनतेला प्रकल्प हवा असेल तर तो नाणार येथे होईल असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, नाणार येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित झाल्यानंतर स्थानिक जनतेने या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. हाच विरोध आम्ही आमच्या माध्यमातून मांडला होता. आता जर जनतेची या प्रकल्पाबाबत भूमिका बदलली असेल तर त्यांच्या इच्छेनुसारच होईल. शेवटी जनता हीच आमची मायबाप आहे. मात्र आम्ही आधी नाणारवासीयांची भूमिका जाणून घेणार आहोत. तेथील नागरिकांशी आम्ही चर्चा करणार आहोत. या चर्चेनंतरच नाणारबाबतची आमची भूमिका ठरवू आणि जाहीर करू असे श्री.राणे म्हणाले.