मोबाईलच्या वापराने नवी पिढी हुशार मात्र त्यांच्यातील संवेदना कमी…

2

 

कमलताई परुळेकर यांची खंत…

मालवण, ता. १९ : सध्याच्या काळात जीवनावश्यक बनलेला मोबाईल आपल्याला कुठे नेऊन ठेवतोय हा विचार आताच आपण करायला हवा. मोबाईलचा वापर नेमका आणि चांगल्या कामासाठीच केला पाहिजे. समुद्रातून मोती वेचायचे, शिंपले वेचायचे की पाय धुवायचे हे आपण ठरवायला हवे. मोबाईलच्या वापराने आताची पिढी हुशार झाली पण त्यांच्यातील संवेदना कमी झाल्या आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस तथा शालेय पोषण आहार संघ अध्यक्षा कमलताई परुळेकर यांनी काळसे येथे केले.
तालुक्यातील काळसे येथील श्री शिवाजी वाचन मंदिर काळसेची वार्षिक सर्वसाधारण सभा काळसे हायस्कूलच्या सभागृहात झाली. सभेचे औचित्य साधून काळसे गावात सामाजिक, सांस्कृतिक कार्यात फार मोठे योगदान देणार्‍या व्ही. डी. प्रभू यांचा भव्य सत्कार सोहळा झाला. व्यासपीठावर श्री शिवाजी वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष योगेश राऊळ, व्ही. डी. प्रभू, सरपंच केशव सावंत, आत्माराम प्रभू, अर्चना प्रभू, राजेंद्र परब, विजय प्रभू, दाजी प्रभू, प्रतिभा कदम, संतोष गुराम, तुकाराम प्रभू, वाचनालय कर्मचारी नंदू प्रभू, हरेष आंग्रे, चारुलता काळसेकर आणि सभासद ग्रामस्थ आणि परिसरातील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
श्रीमती परुळेकर म्हणाल्या, मुलांना वाचनालयाकडे आकर्षित करण्यासाठी मुलांना आवडेल असे काहीतरी वाचनालयात ठेवता येईल का याचा विचार व्हायला हवा. कारण शाळेनंतर ज्ञानाचे दुसरे घर म्हणजे वाचनालय आहे. समाजाला पूरक असे आपण स्वतःला बदलायला हवे. भविष्यात माणुसकी हा धर्म आपण मानणार तेव्हाच आपण सर्वजण बंधुभावनेने वागणार आहोत. आज शिक्षण क्षेत्रासाठी सर्वस्व दान करणार्‍या व्ही. डी. प्रभू यांच्यासारख्या शिक्षणतपस्वी व्यक्तिमत्त्वाचा सत्कार माझ्या हस्ते झाला हे मी माझे भाग्य समजते. आताच्या काळात शिक्षण सम्राट उदयास आले आहेत पण पूर्वी जसे शिक्षण महर्षी असायचे त्यांचे गुण मला प्रभू यांच्यात दिसतात. गावातील सामाजिक, शैक्षणिक संस्था टिकविण्याचे आणि काही संस्था निर्माण करण्याचे कार्य प्रभूंनी केले. आणि आज वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांची सामाजिक कार्याची तळमळ एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. मुंबईत शिक्षण घेऊन गावी येत ज्ञानदान करण्याचा त्यांचा मोठेपणा आहे.
यावेळी श्री शिवाजी वाचन मंदिरच्यावतीने कमलताई परुळेकर यांच्या हस्ते व्ही. डी. प्रभू यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. वाचनालय कर्मचार्‍यांच्यावतीनेही श्री. प्रभू यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

9

4