युवक काँग्रेसकडून भाजप- शिवसेनेचे श्राद्ध…

102
2
Google search engine
Google search engine
Google search engine

निवती व यशवंत गड किल्ले भाड्याने देण्याचा निषेध…

वेंगुर्ले, ता. १९ : महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील निवती आणि यशवंतगड किल्ला भाड्याने देण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आज निवती किल्ल्यावर सत्ताधारी भाजप- शिवसेना सरकारचे श्राद्ध घातले. कोणत्याही परिस्थितीत एकाही किल्ल्याचे खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती, व यशवंतगड या किल्ल्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी रक्ताचे पाणी करून उभारलेले महाराष्ट्रातील २५ किल्ले फडणवीस सरकारने ३ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेत लग्न समारंभ आणि पार्ट्यांसाठी भाड्याने देण्याचे ठरवले आहे. भविष्यात याच ठिकाणी मद्य विक्री देखील केली जाईल, त्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने भाजप शिवसेना युती सरकारचा आज दुपारी निवती किल्ल्यात श्राद्ध घालून निषेध करण्यात आला. युती सरकारची नैतिकता हरवली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विधानसभा क्षेत्रातील दोन किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना स्वतः पालकमंत्री या विषयावर काही बोलत नाहीत, हे जिल्ह्याचं दुर्देव आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील सर्वच गड – किल्ले आमच्यासाठी मंदिरा समान आहेत, या मंदिराचे पावित्र्य नष्ट होऊ नये असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रांतिक सदस्य इर्शाद भाई शेख यांनी व्यक्त केला. यापुढेही एकही किल्लाचे खासगीकरण करु देणार नाही. सरकारच्या नावाने आता फक्त निवती किल्यावरच श्राद्ध घातलं आहे, परंतु यापुढे हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, प्रवक्ते अरविंद मोंडकर, योगेश्वर कुर्ल्ये, महेंद्र चोपडेकर, नागेश मोंडकर व इतर नागरिक उपस्थित होते.

\