शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करावा…

2

पारंपरिक मच्छीमारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : भाजप तालुकाध्यक्षांकडे सुपूर्द…

मालवण, ता. १९ : मत्स्यदुष्काळाचे निकष बदलून २०१८-१९ या वर्षासाठी मत्स्यदुष्काळ जाहीर करावा तसेच भविष्यात मत्स्यदुष्काळ होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्यांचे निवेदन आज पारंपरिक मच्छीमारांनी भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्याकडे सुपूर्द केले.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांच्या भावना लक्षात घेत आपल्या भाषणात वाच्यता केल्याने त्यांच्या भूमिकेचे पारंपरिक मच्छीमारांनी स्वागत करत त्यांचे आभार मानले.
राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स, एलईडी पर्ससीनधारक विध्वंसक पद्धतीने मासेमारी करत आहेत. एकीकडे पुरेसे मासे मिळत नाही तर दुसरीकडे जाळ्यांचे नुकसान असे दुहेरी संकट मच्छीमारांवर ओढवले आहे. त्यामुळे शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करावा. भविष्यात अशी समस्या भेडसावू नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक गणेश कुशे, महेंद्र पराडकर, मिथुन मालंडकर, भाऊ मोरजे, संतोष शेलटकर, जगन्नाथ सावजी, चैतन्य सावजी आदि उपस्थित होते.
श्री. केनवडेकर म्हणाले, पारंपरिक मच्छीमारांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन द्यायचे होते. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव ते शक्य झाले नाही. या घटनेमुळे पारंपरिक मच्छीमारांना जो त्रास झाला त्याबाबत आपण दिलगिरी व्यक्त करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने पारंपरिक मच्छीमारांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि भाजप सरकार मच्छीमारांच्या पाठीशी राहणार आहे.
आजपर्यंत इतर पक्षांनी मच्छीमारांचा फक्त वापर करून घेतला. परंतु भाजप पारंपरिक मच्छीमारांच्या सर्व प्रश्‍नांचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. हायस्पीड बोटींनी पारंपरिक मच्छीमारांची जाळी लाखो रुपयांची जाळी तोडली आहेत. याबाबत आपण रवींद्र चव्हाण यांना माहिती दिली आहे. मंत्रालयात होणार्‍या बैठकीत आमदार रवींद्र चव्हाण हे तुटलेल्या जाळ्यांच्या प्रश्‍नाबाबत निश्‍चितच आवाज उठवतील. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी समुद्रात उतरून
हायस्पीड बोटींवर कारवाई करून फक्त दिखावा केला आहे. त्यांनी जर यासाठी प्रशासनाला कामाला लावून ही कारवाई केली असती तर भाजपच्यावतीने आम्ही त्यांचे अभिनंदन केले असते असे श्री. केनवडेकर यांनी स्पष्ट केले.

4

4