नाणारवर बोलण्याआधी खासदार राऊत यांनी ठाकरेंचा सल्ला घ्यावा

2

राजश्री धुमाळे: दोन वेळा खासदार झालेल्या राऊतांनी किती रोजगार आणला

कणकवली, ता.२०: नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्दयावर खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका अनाठायी आहे. खासदारांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. तसेच नाणार मुद्दयावर बोलण्याआधी खासदारांनी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचा सल्ला आधी घ्यावा अशी टीका भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांनी आज येथे केली.
येथील भाजप कार्यालयात सौ.धुमाळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाहतूक आघाडीचे शिशिर परुळेकर, तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, सूर्यकांत पावसकर, पप्पू पुजारे आदी उपस्थित होते.
धुमाळे म्हणाल्या, आदित्य ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत चांगले मत व्यक्त केले होते. स्थानिकांचा पाठिंबा असेल तर प्रकल्प होण्यास काहीही हरकत नाही असेही वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र याच्या नेमकी उलटी भूमिका खासदार विनायक राऊत घेत आहेत. नाणार प्रकल्पातून कुणाला आणि किती रोजगार मिळणार असे प्रश्‍न ते मुख्यमंत्र्यांना विचारात आहेत.
नाणार प्रकल्पातून एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच स्थानिकांनी नाणार येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होणार असल्याची घोषणा केली. यात टीका करण्यासारखे काहीच नव्हते. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मोदी लाटेवर खासदार विनायक राऊत हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही असे राजश्री धुमाळे म्हणाल्या.
खासदार विनायक राऊत हो दोन वेळा निवडून आले. पण त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात किती नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या याची माहिती आधी जनतेला द्यावी. नंतरच नाणार प्रकल्पाला विरोध करावा. सहा-सहा महिने दिल्लीत जाऊन बसणार्‍या खासदारांना सिंधुदुर्गातील रोजगाराचे प्रश्‍न काय समजणार. नाणार व्हावा ही रत्नागिरी-सिंधुदुर्ग जनतेची इच्छा आहे आणि आम्ही तो पूर्ण करणारच असेही राजश्री धुमाळे म्हणाल्या.

9

4