खारेपाटण येथे चौघांना मधमाशांचा चावा

2

दोघे बेशुद्ध: कणकवलीत उपचार सुरू

कणकवली, ता.२०: तालुक्यातील खारेपाटण येथील श्रीदेव काळभैरव मंदिराच्या स्लॅपची गळती पाहण्यासाठी गेलेल्या चार जणांना आज मधमाशांनी चावा घेतला. सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. यात दोघे बेशुद्ध झाले होते, तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी कणकवलीत आणण्यात आले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये मधुकर शंकर गुरव (वय 65), राजेंद्र जयप्रकाश वरूणकर (वय 41), प्रशांत गोपीनाथ गाढे (वय 45) आणि श्री.सरनाईक यांचा समावेश आहे. या सर्वांवर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.जितेंद्र मंडावरे यांनी प्राथमिक उपचार केले.
खारेपाटणचे ग्रामदैवत असलेल्या कालभैरव मंदिराच्य शिखरावरून पावसाचे पाणी झिरपत आहे. त्याबाबतची पाहणी करण्यासाठी अभियंता श्री.सरनाईक यांच्यासमवेत मधुकर गुरव, राजेंद्र वरूणकर, प्रशांत गाढे हे सर्व आज सकाळी 10.30 च्या दरम्यान मंदिराच्या शिखरावर गेले होते. यावेळी अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर मंदिराच्या शिखरावरील या चौघांसह मंदिरात आलेल्या भाविकांनीही तेथून पळ काढला. या घटनेत मंदिराचे अध्यक्ष मधुकर गुरव आणि अभियंता सरनाईक यांना मधमाशांनी मोठ्या प्रमाणावर डंख मारले आहेत. या सर्वांवर कणकवलीतील रूग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.

12

4