सावंतवाडी,ता.२५: सिंधुदुर्ग जयहिंद कॉलेजचे प्राचार्य शेफ अमेय महाजन आणि शेफ टेरी डिसा यांनी गोवा हेरिटेज कुकिंग स्पर्धेत ‘हेरिटेज मास्टर शेफ’ पुरस्कार मिळविला आहे. याच स्पर्धेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही आपली चुणूक दाखवली. कॉलेजचे विद्यार्थी अंकित धुरी आणि शुभम देसाई यांनी द्वितीय रनर उपक्रमांक पटकावला.
गोवा हेरिटेज कुकिंग स्पर्धेचे आयोजन गोवा हॉस्पिटॅलिटी शो २०२४ च्या अंतर्गत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इन्डोअर स्टेडियम, पणजी-तिवळ,गोवा येथे करण्यात आले होते. हे दोन पुरस्कार मिळवून जयहिंद कॉलेजने आपला दर्जा आणि शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध केली आहे. या स्पर्धेचे परीक्षण अंजली वालावलकर, सुझेटी मार्टिन, सुनिता रॉड्रिग्स आणि शेफ कुणाल आरोलकर यांनी केले. शेफ अमेय महाजन आणि शेफ टेरी डिसा यांनी गोव्याचा सांस्कृतिक वारसा दर्शविणारा ‘पूर्वजांचो मोग’ या नावाने गोव्याच्या पारंपरिक पदार्थाचे सादरीकरण केले. यात सुक्या माशांचा वापर, कोळंबी, फिश करी, कोळंबी करी, गोवन लोणचं, उकडो भात, तिसरे सुक्के,सान्ना, गोवन पोई, शिरवाळे आणि रस अशा असंख्य गोवन पारंपरिक पदार्थांचा समावेश होता. या पदार्थांनी सर्व उपस्थितांना आकर्षित केले.
या यशामुळे कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवता गेला आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्षमता मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाही, हे आज सिद्ध झाल्याचे मत लोकमान्यचे सिनिअर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला ऋषिकेश सूर्याजी, हर्षद धुरी आणि कॉलेजचे विद्यार्थीही उपस्थित होते.