इर्शाद शेख; दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी…
ओरोस,ता.२६: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण ही फार दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे. त्यामुळे यात दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची अस्मिता नाहीतर महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची अस्मिता आहे. या अस्मितेचा अशा प्रकारे अपमान करणे ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. डिसेंबर 2023 मध्ये या पुतळ्याच बांधकाम झालं होते. आठ महिन्याच्या आत हा पुतळा कोसळला. त्यामुळे याचे बांधकाम किती तकलादू होते, हे दिसून येते. त्यामुळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आज आपण पाहतो शिवाजी महाराजांवर आस्था नसणारे लोक शिवाजी महाराजांचा आपल्या फायद्यासाठी आपल्या चमकेगिरीसाठी इव्हेंट करतात आणि तो इव्हेंट करून आपली पोळी भाजून घेतात. अशा लोकांना शिवाजी महाराजांबद्दल कुठल्याही प्रकारची आस्था नसते, असे लोक फक्त शिवाजी महाराजांचा उपयोग करून घेतात. हे आपल्याला या घटनेतून दिसून आलेले आहे. म्हणून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. शिवाजी महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमी व्यक्तीला फार क्लेश करणार आहे. तसेच अशा प्रकारची दुर्दैवी घटना भविष्यात घडू नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी व्यक्त केली आहे.