प्राचार्य पाटील; फोंडाघाट महाविद्यालयात °अहिंसा से मानवता तक’ उपक्रमात प्रतिपादन…
फोंडाघाट,ता.२१:. शांती आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. गरिबी निर्मूलन, स्त्रीयांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी देशभरात चळवळ चालू केली. इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी दांडी यात्रा काढली. इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. पण तरीही गांधीजींनी आयुष्यभर शांती आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला. असे प्रतिपादन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रा. डाँ. एस. एन. पाटील यांनी केले. ते फोंडाघाट महाविद्यालयातील एन. एस. एस. विभागाने आयोजित केलेल्या ‘अहिंसा से मानवता तक’ या अभियानांतर्गत ‘म. गांधीजींचे शांती व अहिंसेचे तत्वद्ऩ्यान’ या विषयावर बोलत होते. आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले की, स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी म. गांधीजींची साधी राहणी होती. त्यांनी जन्मभर शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा धार्मिक कारणांसाठी तसेच विरोधाचे साधन म्हणून दीर्घ उपवासही केले. अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे ते खरे पाईक असल्याचे डाँ. पाटील यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात यावेळी विद्यार्थ्यांना शांती व अहिंसेची शपथ देण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य डाँ. सतीश कामत यांनी महात्मा गांधीचे विचार समकाळाशी कसे जोडून घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले.
सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते प्रथमच व्यक्ती होते. “माझे सत्याचे प्रयोग” मध्ये गांधीजींनी शांती व अहिंसेचे तत्वज्ञान मांडले असल्याचे डाँ. कामत यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन एन. एस. एस. विभागप्रमुख डाँ. बालाजी सुरवसे यांनी केले. आभार सहाय्यक प्रा. संतोष आखाडे यांनी मानले. कार्यक्रमाला डाँ. संतोष रायबोले, डाँ. राजाराम पाटील, डाँ. बी. वाय डाफळे, प्रा. जगदीश राणे, प्रा. विनोदसिंह पाटील, प्रा. सारीका राणे, प्रा. मयुरी सावंत आदी उपस्थित होते.