आचारसंहितेमुळे विस्थापित शिक्षकांचे आमरण उपोषण स्थगित

2

सिंधुदुर्गनगरी.ता,२१:
ऑनलाइन जिल्हान्तर्गत बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या चुकीच्या कार्यपध्दतमुळे विस्तापित झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातील अनिवार्य रिक्त पदांवर सामावून घेण्याच्या मागणीसाठी विस्तापित शिक्षकांनी आपले आमरण उपोषण आचारसंहिता कालावधीसाठी स्थगित केले आहे. तर आचारसंहितेनंतर आपल्याला न्याय न मिळाल्यास पुनः आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या ऑनलाइन जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत काही शिक्षकांना दूर वरच्या शाळा देण्यात आल्या होत्या. तर काही पतिपत्नी शिक्षक दूर दूरच्या शाळांमध्ये बदली झाली होती. काही शाळा अवघड क्षेत्रातील असून त्या ठिकाणी महिला शिक्षक काम करू शकत नाहीत. त्यामुळे जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत विस्तापित झालेल्या आणि रॅंडम राउंड मधील एकूण ६ शिक्षकांनी कोकण आयुक्तांकडे अपील केले होते. यावर सुनावणी होवून सम्बंधित शिक्षकांना जिल्ह्यातील अनिवार्य रिक्त जागांवर सामावून घेण्यात यावे असे आदेश ९ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. मात्र समानीकरणाच्या नावावर अनिवार्य रिक्त पदांवर शिक्षकांचे समायोजन करण्यास शिक्षण विभागाने नकार देत केवळ देवगड, वैभववाडी आणि दोडामार्ग या तालुक्यातील शाळांमध्ये समायोजन करण्याचा हट्टहास लावून धरला आहे. मात्र या तींन्ही तालुक्यातील पदे सोईस्कर नसल्याने १३ सप्टेंबरच्या समुपदेशनवर या शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे विस्तापित शिक्षकांचे मानसिक खच्चिकरण होत आहे. तसेच ऑनलाइन जिल्हान्तर्गत बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या चुकीच्या कार्यपध्दतमुळे विस्तापित झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातील अनिवार्य रिक्त पदांवर सामावून घेण्याच्या आयुक्तांच्या आदेशाला प्राथमिक शिक्षण विभागाने हरताळ फासल्याने शैक्षणिक आणि प्रापंचिक दृष्टया अडचणीत सापडलेल्या अन्यायग्रस्त शिक्षकांनी २० सप्टेंबर पासून प्राथमिक शिक्षक समितीचे सल्लागार चंद्रकांत अनावकर यांच्या नेतृत्वाखाली जिप भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. यात सायली आटक, मुग्धा नातू, गोपाळ गावडे, ईश्वरलाल कदम यांचा समावेश होता. दरम्यान आज या शिक्षकांनी कोकण आयुक्तांशी संपर्क साधला असता जिल्ह्यात सद्या आचारसंहिता लागू असल्याने प्रशासन आपल्या मागणीवर निर्णय देवू शकत नाही. आचारसंहिता संपल्यावर निर्णय घेवू असे आश्वासन कोकण आयुक्तांनी दिले. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून या शिक्षकांनी आपले उपोषण स्थगित केले.
रात्री अधिकाऱ्याकडून दमदाटी
आपण या शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी जिप समोर उपोषण सुरु केले होते. हे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरु असतानाही शिक्षणक्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उपोषण स्थळी भेट देत दमदाटी केली असल्याचा आरोप चंद्रकांत अनावकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

18

4