मालवणात २८ ऑगस्टला शिवप्रेमींच्या वतीने निषेध मोर्चा…
मालवण, ता. २६ : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ व यामागे जबाबदार असलेल्या प्रत्येक यंत्रणा व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी शिवप्रेमींच्या वतीने २८ ऑगस्टला शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
शहरातील मेढा राजकोट परिसरात ४ डिसेंबरला उभारण्यात आलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळून उध्वस्त झाला. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. मोठा गाजावाजा करून व अफाट खर्च करून उभारलेली ही शिवप्रतिमा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे हे क्लेशदायक तर आहेच शिवाय संबंधित यंत्रणेच्या भ्रष्टाचाराचे स्पष्ट द्योतक आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई व्हावी यासाठीच या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.