जनार्दन विचारे; प्रसिद्धीपत्रकाव्दारे केला आरोप
वैभववाडी;
भुईबावडा सजामधील तलाठी श्री. यु. जी. कदम यांच्या विरोधात ऐनारी ग्रामस्थांनी केलेली तक्रार ही सुडबुद्धीने केली असल्याचा आरोप शिवसेना माजी उपतालुका प्रमुख तथा ऐनारी तंटामुक्ती अध्यक्ष जनार्दन विचारे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केला आहे.
भुईबावडा सजामधील तलाठी श्री कदम यांच्या विरोधात ऐनारी ग्रामस्थांनी केलेली तक्रार सुडबुद्धीने असल्याचा आरोप शिवसेना माजी उपतालुका प्रमुख जनार्दन विचारे यांनी केला. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत ऐनारी येथील आत्माराम लुकाजी पांचाळ, सुहासिनी सखाराम गुरव व राजाराम विठोबा सुतार यांचे घर कोसळले.
सदर नुकसानीचा श्री. कदम यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तसेच या अतिवृष्टीत काजू बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र या आपत्तीत कुणाचीही भात शेती, गोठे वाहून गेलेले नाही. सदर नुकसानीचा पंचनामा कृषी विभाग, तलाठी व ग्रामसेवक यांनी घटनास्थळी जावून केला आहे.
तसेच दोन वर्षापूर्वी ऐनारी ग्रामसभेत तलाठी श्री. कदम यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला होता. मात्र या ठरावाची अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यानंतर श्री. कदम गावात चांगली सेवा देत आहेत. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.