Monday, November 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याइन्सुलि-क्षेत्रफळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा

इन्सुलि-क्षेत्रफळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा

बांदा.ता,२२:
इन्सुली-क्षेत्रफळवाडी येथील शेतकरी अनंत यशवंत भिसे यांच्या घरानजीकच्या गोठ्यात शिरून बिबट्याने गाईच्या सहा महिन्यांच्या वासराचा फडशा पाडला. या घटनेने व बिबट्याच्या वावराने इन्सुली गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी इन्सुली क्षेत्रफळ वाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.
अनंत भिसे यांनी घरानजीकच्या गोठ्यात काल रात्री ११.३० च्या सुमारास गाईंच्या हंबरण्याचा आवाज ऐकताच गोठ्याच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी त्यांना गोठ्यात रक्ताचे डाग दिसले. मात्र गाई व वासरू सुखरूप होती. पहाटेच्या सत्रात दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासराचा गोठ्यातच फडशा पाडला.
सकाळी दूध काढण्यासाठी गेलेल्या अनंत भिसे यांच्या पत्नीला नजरेस वासरू न पडल्याने त्यांनी याबाबतची माहिती आपल्या पतींना दिली. त्यांनी आजूबाजूस पाहणी केली असता गोठ्यानजीकच वासराचा केवळ सांगाडा आढळून आला. वनविभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भिसे यांचे २ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. भरवस्तीपर्यंत बिबट्या सावजाच्या शोधात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी क्षेत्रफळवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments