गणेश कुडाळकर : टिकेबद्दल केणींनी माफी मागावी…
मालवण, ता. २२ : शिवसेनेवर टीका केलेल्या विरोधी पक्षातील व्यक्तींना शिवसेनेत थेट प्रवेश मिळाल्याने काही शिवसेना, पदाधिकार्यांमध्ये नाराजी होती. मात्र वरिष्ठ नेत्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमच्यातील नाराजी दूर झाली आहे. मात्र खासदार, आमदार, पालकमंत्र्यांवर केलेली टीका आम्ही विसरू शकत नसल्याने केणींनी मालवणात आल्यावर माफी मागावी असे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
आमच्या नेत्यांवर ज्यांनी आरोप केले सातत्याने टीका केली अशा विरोधी पक्षातील व्यक्तींना थेट शिवसेनेत प्रवेश मिळाल्याने मालवण शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांत काहीशी नाराजी पसरली. मात्र शिवसेना हा नेत्यांच्या आदेशावर एका विचाराने चालणारा पक्ष आहे. आमच्या नाराजी बाबत जिल्ह्यातील वरिष्ठ नेते यांनी आमच्याशी संवाद साधला. पक्षप्रवेश हा पक्ष वाढीच्या दृष्टीने घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. आपल्या सर्वांच्या प्रामाणिक मेहनतीमुळे संघटना वाढत आहे. अशा स्थितीत कितीही पक्ष प्रवेश झाले तरी निष्ठावान शिवसैनिकांचा पक्षात सन्मानच असेल. प्रवेशकर्त्याना कोणतीही कमिटमेंट देण्यात आली नसल्याचेही वरिष्ठांनी स्पष्ट केले. त्यामुळे आमच्यात असलेली नाराजी दूर झाली आहे. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेनेच्या धेय्यधोरणाप्रमाणे संघटना वाढीसाठी काम करावे. आमचा कोणताही विरोध केणी व अन्य प्रवेशकर्त्याना नसेल. यापुढे आमदार वैभव नाईक यांना मोठे मताधिक्य मिळवून देणे हेच आमचे पहिले लक्ष्य असेल असे श्री. कुडाळकर यांनी म्हटले आहे.