स्वच्छता पंधरवड्यानिमित्त मालवणात सायकल रॅली…
मालवण, ता. २२ : भारत सरकारतर्फे देशात स्वच्छता पंधरवडा सुरू असून या अंतर्गत येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग व ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरात स्वच्छता सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीतून नागरिकांना स्वच्छतेबाबत संदेश देण्यात आला.
येथील पालिकेकडून रॅलीला सुरवात झाली. उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, ५८ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार दिलीप कुमार, प्रा. डॉ. आर. एन. काटकर, प्रा. बी. एच. चौगुले, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, रणरागिणी ग्रुपच्या डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. मधुरा काटकर, अॅड. सोनल पालव, डॉ. शुभांगी जोशी यांसह एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नितीन तायशेटे, प्राचार्य डॉ. मंडले, डॉ. शुभांगी जोशी यांनी उपस्थित एनसीसी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. यावेळी उत्कृष्ट एनसीसी कॅडेट्सना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
एनसीसी विभागाचे लेफ्टनंट प्रा. डॉ. खोत यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता सायकल रॅली काढण्यात आली. पालिका येथून सुरू झालेली ही स्वच्छता रॅली भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फावकांडा पिंपळ ते धुरीवाडा येथून सागरी महामार्ग ते देऊळवाडा येथून पुन्हा भरड ते सिंधुदुर्ग महाविद्यालय अशी ही रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान एनसीसी विद्यार्थ्यांनी विविध फलकांद्वारे स्वच्छता व कचरा व्यवस्थापन यासंदर्भात नागरिकांना जागृतीपर संदेश दिला.