मुणगेत भक्तिमय वातावरणात सार्वजनिक गणरायाला निरोप…
मुणगे, ता. २२ : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात मुणगे येथील ग्रामदेवता श्री भगवती देवालयातील स्थानापन्न सार्वजनीक गणपतीचे २१ दिवसानी मुणगे आडवळवाडी समुद्र किनारी विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवा निमित्त वातावरण भक्तिमय बनले होते. वाद्यांच्या दणदणाटाने व फटाक्यांच्या आताषबाजीने विसर्जन मिरवणुकीला चार चाँद लावले.
गणेशोत्सवा निमित्त आरती, फुगड्या, दिंडी नृत्य, संगित मैफील, सोलो पखवाज वंदन, स्थानिक तसेच जिल्ह्यातील नामांकीत बुवांची भजने, तिरंगी डबलबारी भजन सामना आदि कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान ट्रस्ट, गावातील विविध मंडळे, तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. आज दुपारी विधिवत पुजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. बौद्धवाडी, सावंतवाडी, लब्देवाडी, भंडारवाडी, आडवळवाडी आदी मार्गावर ठिकठिकाणी भाविकाना अल्पोपहार तसेच सरबत वाटप करण्यात आले. समुद्र किनारी सायंकाळी महाआरती झाल्यानंतर गणरायाला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत गावातील तमाम आबालवृद्ध सहभागी झाल्याने गर्दीचा महापुर समुद्र किनारी लोटला होता.