पोलिसांच्या विरोधात मानवी हक्क आयोगाकडे याचिका दाखल करणार

2

सुहास सावंत:मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी चुकीच्या कारवाईच्या विरोधात भूमिका

सिंधुदुर्गनगरी ता.२३:मुख्यमंत्र्यांच्या येथील दौऱ्यादरम्यान मराठा समाज म्हणून आपलं काही ठरलं नसतानाही पोलिसांनी जी जी कारवाई केली त्याविरोधात आपण मानवी हक्क आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार अशी माहिती सकल मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अँड सुहास सावंत यांनी कुडाळ येथील मराठा समाज बैठकीत बोलताना दिली. या बैठकीमध्ये या कारवाईबद्दल शासन व प्रशासन यांचा निषेधाचा ठरावही घेण्यात आला.
येथील मराठा समाज सभागृहात सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना अँड.सावंत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्गातील या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवणे, शाई फेकणे , कोंबडी फेकणे असे कोणतेही नियोजन नसताना आम्ही एक गुन्हेगार आहोत तशा प्रकारच्या अटक आपल्याला करण्यात आली. कोणत्याही कार्यकर्त्याच्या गाडीमध्ये काळे झेंडे, शाही तसेच आंदोलन साठीच्या कोणत्याही वस्तू सापडल्या नाहीत , काही जणांचा याच्याशी कोणताही संबंध नसतानाही नाश्ता करताना त्यांना अटक झाली ही बाब संतापजनक आहे. त्यामुळे पोलिसांविरोधात आपण ही याचिका दाखल करणार आहोत असे अँड सुहास सावंत यांनी सांगितले. मराठा समाजाची एकजूट ही राजकीय करिअर घडवण्यासाठी नसून समाज हितासाठी हाती घेतलेले हे एक व्रत आहे . मंगळवारी झालेल्या कारवाईनंतर भाजपने आपली अधिकृत कोणती भूमिका जाहीर केले नाही याचा अर्थ तुमचा या कारवाईला पाठिंबा होता असे आपण गृहीत धरतो . यावर पालकमंत्र्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली मात्र भाजपने तसे काहीच केले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात यांनी समाजाला गृहीत धरू नये असे सांगत आमचे काहीच ठरलेले नसताना पोलीस येऊन सरळ मराठा कार्यकर्त्यांना उचलतात आम्ही कुठे दादागिरी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत या कारवाईनंतर अटकेबाबतचे कोणतेही नियम पोलिस प्रशासनाने पाळले नसल्याने वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे आता पण पोलिस दला विरोधात उभे राहिले पाहिजे असे सांगितले. या याचिके दरम्यान जे जे मराठा बांधव येथील त्यांना सहयाचिकाकर्ता म्हणून यात सामावून घेतले जाईल असे स्पष्ट केले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यादिवशी मराठा क्रांती मोर्चा झाला होता त्या दिनाच्या निमित्ताने मराठा ज्ञानप्रबोधिनी स्थापन करण्याचा आपला विचार आहे. मुलांना सीबीएससी च्या धर्तीवर या माध्यमातून शिक्षण दिले जाईल. बेरोजगार उच्च शिक्षित मुलांना याबाबतचे प्रशिक्षण देऊन मुलांना एक दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे. शासनाने मराठा समाजावरील सिंधुदुर्गातील केवळ एक गुन्हा वगळता सर्व गुन्हे मागे घेतल्याचे जाहीर केले पण परंतु अद्यापपर्यंत न्यायालयात एकही पत्र आले नाही. शासन केवळ घोषणाबाजी करत असेल तर मराठा समाजाला याबाबत विचार करावा लागेल असे सांगत ज्या गड-किल्ल्यांना शिवाजी महाराजांचा व मराठ्यांचा इतिहास लाभला आहे असे जिल्ह्यातील गड किल्ले पुढच्या पिढीला आपण रिसॉर्ट दाखवायचे का? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी उपस्थित मराठा समाज बांधवांनीही पोलिस प्रशासनाच्या या कारवाईबाबत तीव्र संतापजनक प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या. अशा प्रसंगात प्रशासनाला जाब विचारलाच पाहिजे विनाकारण कारवाई होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही उपस्थित मराठा बांधवांनी यावेळी दिला. यावेळी गावोगावच्या मराठा समाजाला आपली पक्ष व इतर चिन्हे बाजूला ठेवून एक समाज म्हणून एकत्र करण्याचा यावी निर्धार त्यांनी व्यक्त केला*

11

4