प्रमोद जठार: राणेंबाबत पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल
कणकवली, ता.२३: भाजप हा बिघडविणारा पक्ष नाही, तर घडवणारा पक्ष आहे. खासदार नारायण राणे हे भाजपमध्ये आले तर त्यामुळे पक्ष बिघडणार नाही, तर त्यांना भाजपच्या मुशीतून घडवण्याचं काम आम्ही करू अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज दिली. राणेंना भाजपमध्ये घेण्याबाबत पक्षातील नेत्यांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र राणेंना भाजपत घेण्याचा निर्णय झाला तर तो आम्हा सर्वांना मान्य करावाच लागेल असेही ते म्हणाले. भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी राणेंचा भाजप प्रवेशाला विरोध केला होता. यावर पारकरांचे भाजपमधील वय काय? असा प्रश्न श्री.जठार यांनी केला. तर युती झाली तर सावंतवाडीतून राजन तेली यांना लढता येणार नाही. मात्र त्यांनी बंडखोरी केली तर त्यांना निश्चितच त्रास होईल असेही श्री.जठार म्हणाले.
येथील भाजप कार्यालयात प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाहतूक आघाडीचे शिशिर परुळेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, आरोग्य आघाडीचे अरविंद कुडतरकर आदी उपस्थित होते.
श्री.जठार म्हणाले, राणेंच्या भाजप प्रवेशाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. यावेळी राजन तेली, सदा ओगले, संदेश पारकर, अतुल रावराणे, अतुल काळसेकर आदींनी आपापल्या भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. आता तेच राणेंबाबतचा निर्णय घेतली. भाजपने जर राणेंना पक्षात घेतले तर त्यांना भाजपच्या मुशीतून घडवलं जाईल.
संदेश पारकर यांनी राणेंना भाजपत घेतले तर पक्ष बिघडेल अशी भीती व्यक्त केली होती. यावर बोलताना पारकरांचे भाजपमधील वय काय? असा प्रश्न श्री
जठार यांनी केला. तसेच कुणाच्या येण्याने भाजप बिघडणार नाही तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करू. भाजपमध्ये जे जे आले त्यातील कुणीही बिघडलेलं नाही असेही श्री.जठार म्हणाले. तसंच राणे भाजपमध्ये येणार याचा अर्थ नाणार प्रकल्पाला त्यांना निश्चितपणे पाठिंबा असेल असेही श्री.जठार म्हणाले.