राणेंना दगा देत पाठीत खंजीर खुपसण्याचे काम याच पदाधिकाऱ्याने केले…

2

नारळावर हात ठेवून मते मागण्याचे दिवस गेले ; मंदार केणींची सामंतांवर टीका…

मालवण, ता. २३ : स्वाभीमानमधील पदाधिकार्‍यांचे, कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे, नारायण राणेंना दगा देण्याचे शिवाय त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या पदाधिकार्‍याने केले. आता राजकारणात देवालाही पकडू लागले आहेत. मात्र गावागावात जात पैसे देऊन नारळावर हात ठेवून मते मागण्याचे दिवस आता गेले. त्यामुळे असे राजकारण करण्याचे सोडा अशी घणाघाती टीका शिवसेनेत प्रवेश केलेले मंदार केणी यांनी स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचे नाव न घेता येथे केली.
आम्ही ज्या पक्षात गेलो त्या पक्षाची रोखठोक भूमिका मांडू. कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करणार नाही. येत्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना ९० टक्के यश मिळवून देऊ असा विश्‍वासही केणी यांनी दिला.
स्वाभीमानचे तालुकाध्यक्ष तथा पालिकेतील विरोधी पक्षाचे गटनेते मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, शीला गिरकर, दर्शना कासवकर या चार नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. या चारही नगरसेवकांचे आज शहरात तालुका शिवसेनेच्यावतीने ढोल, ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. येथील तालुका शिवसेना कार्यालयात माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते या चारही नगरसेवकांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बाबी जोगी, भाई कासवकर, बंड्या खोत, शिल्पा खोत, पूनम खोत, सेजल परब, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, अंजना सामंत, देवयानी मसुरकर, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, पूजा तोंडवळकर, यशवंत गावकर, दीपक देसाई यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेच्या स्वागताने आम्ही भारावलो. आमदार नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यात संघटनेचे चांगले काम आहे. कोणत्याही पदाच्या शर्यतीत आपण नसून तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्ष संघटना वाढीवर भर देऊ. तालुकाध्यक्ष म्हणून लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांवर जी टीका केली ती पक्षाची भूमिका होती. यात माझ्या मनात वैयक्तिक कोणाबद्दलही द्वेष नव्हता. त्यामुळे या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. पक्षाला जी मदत लागेल ती येत्या काळात करू. लोकसभा निवडणुकीत जे अपेक्षित यश शहरातून मिळाले नाही. मात्र येत्या निवडणुकीत ९० टक्के यश हे आमदारांना मिळवून देऊ असा विश्‍वास केणी यांनी व्यक्त केला.
मंदार केणी यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होतील. गेल्या चार वर्षाच्या काळात केणी व त्यांच्या सहकार्‍यांनी चांगले काम केले आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करतो. येत्या काळात विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन आमदार नाईक यांनी केले. यावेळी भाई गोवेकर यांनीही आपले विचार मांडले.

16

4