विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

107
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मतदान टक्का वाढविण्यासाठी नागरिकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी ता,२३ : भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेला सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरीत्या पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले.

भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर प्रथमच जिल्हाधिकारी डॉ पांढरपट्टे यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ जयकृष्ण फड उपस्थित होते.

डॉ पांढरपट्टे म्हणाले, जिल्ह्यात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या तिन्ही मतदार संघात एकाचवेळी 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 5 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 24 ऑक्टोंबर 19 रोजी मतमोजणी होईल. कणकवली मतदार संघासाठी कणकवली विद्यामंदिर, कुडाळसाठी कुडाळ येथील नविन शासकीय रुग्णालय व सावंतवाडीसाठी नवीन तहसील कार्यालय इमारत मतमोजणी केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. त्या-त्या विभागाचे प्रांताधिकारी हे तेथील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील.

6 लाख 69 हजार 665 मतदार

जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 6 लाख 69 हजार 665 मतदार आहेत. यात पुरुष मतदार 3 लाख 33 हजार 298 तर 3 लाख 36 हजार 367 महिला मतदार आहेत. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे ज्यांची नावे अद्याप यादीत नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावे, असे आवाहन डॉ पांढरपट्टे यांनी केले.

मतदान केंद्रांत वाढ

डॉ पांढरपट्टे म्हणाले, सन 2019 च्या

लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात 915 मतदान केंद्रे होती. त्यात आता एक मतदान केंद्र वाढणार आहे. अरुणा प्रकल्पात बाधित झालेल्या आखवणे गुरववाडी शाळेमध्ये हे मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत. तसेच मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था, व्हिल चेअर आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी pwd app ची सुविधा देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

इव्हिएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (इव्हिएम)चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात पुरशी यंत्रे उपलब्ध झाली आहेत. तसेच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार आहे. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

मतदान टक्केवारी

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत जिल्ह्यात 67.52 टक्के तर 2014 च्या निवडणुकीत 68.13 टक्के मतदान झाले होते. यावेळी दुबार व मयत मतदार वगळण्यात आले आहेत. यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून 70 ते 75 टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा असल्याचे डॉ पांढरपट्टे यांनी सांगितले.

कर्मचारी सज्ज

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 हजार 174 अधिकारी-कर्मचारी यांची गरज आहे. जिल्ह्यात 7 हजार 933 अधिकारी-कर्मचारी आहेत. या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदार जनजागृती

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी आवाहन, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची (इव्हीएम) सुरक्षितता आदींबद्दल मतदारांना माहिती देण्यात येणार आहे. इव्हिएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर पूर्ण जिल्ह्यात होणार असल्यामुळे मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशिनवर यासंबंधीची माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात एक याप्रमाणे तीन सखी मतदान केंद्रे असणार आहेत. या ठिकाणी सर्व कर्मचारी महिला असणार आहेत.

नवरात्रोत्सवावर कोणतेही बंधन नाही

प्रचार सभा, लाऊड स्पीकर, प्रचार रॅली यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रांताधिकारी तथा त्या-त्या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एकखिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या परवानग्या घेता येणार आहेत. याच दरम्यान, नवरात्रोत्सव असला तरी नवरात्रोत्सव कार्यक्रमावर कोणतेही बंधन राहणार नाही. दरवर्षी प्रमाणे भाविकांना हा उत्सव साजरा करता येणार आहे, असे डॉ पांढरपट्टे यांनी सांगितले.

सी-व्हिजिल व हेल्पलाईन

निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 20 तपासणी केंद्रे, 12 भरारी पथके, 3 व्हिडिओ पथक कार्यरत राहणार आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता समिती असणार आहे. तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मीडिया समिती असणार आहे. ही समिती माध्यमातून आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे.

\