खाडीपट्ट्यात अनधिकृत वाळू उपसा सुरूच…

99
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दहा दिवसांत कारवाई न झाल्यास गौणखनिज कार्यालयासमोर उपोषण छेडणार : विजय केनवडेकर यांचा इशारा…

मालवण, ता. २३ : सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. संबंधित अधिकारी केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण करत आहेत. यासंदर्भात अधिकार्‍यांचे लक्ष वेधूनही ते जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने ते वाळू माफियांना पाठिंबा देत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाळू उत्खनन, वाहतूकीमुळे गोरगरिबांना त्रास होत आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात योग्य कार्यवाही न झाल्यास ओरोस येथील गौणखनिज कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहे.
तालुक्यातील आंबेरी बागवाडी, देवली या ठिकाणी सायंकाळी सहा ते रात्री दोन यावेळेत वाळू उपसा व अनधिकृत वाहतूक होत आहे ती बंद करावी. आंबेरी ते मुख्यरस्त्याकडे सदानंद गोरे यांच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले. अवजड वाहतूकीमुळेच ही झाडे पडली. येथील रस्ता आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे. मसुरे, तेरई, कालावल तसेच धामापूर-बौद्धवाडी तसेच काळसे वाकवाडी येथे अनधिकृत वाळू उत्खनन सायंकाळी सहा ते पहाटे चार यावेळेत सुरू आहे. याठिकाणी परप्रांतीय कामगारांमुळे गावचे वातावरण कलुषित होत आहे. वाळू उत्खननास होड्यांना दिलेली परवानगी मेरीटाईम बोर्डाने तपासावी. परवानग्या नसलेल्या होड्यांवर कारवाई करावी. काळसे, धामापूर, आंबेरी बागवाडी, आंबेरी, देवली, तेरई, कालावल-खाडी, बांदिवडे-मसुरे खाडीपट्टा या गावातील अनधिकृत रॅम्प उद्ध्वस्त करणे किंवा संबंधित जागेत अनधिकृत रॅम्प असून संबंधित जागा मालकांवर गुन्हे दाखल करावेत. वाळू उत्खननाचे पूर्वनियोजित उत्खनन क्षेत्र ठरवत असताना संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय उत्खननास परवानगी देऊ नये.
सन २०१८- २०१९ मध्ये वाळू उत्खनन करून त्यांचा साठा करून ठेवण्यास परवानगी दिलेले क्षेत्र सोडून अनधिकृत वाळू साठवून ठेवलेल्या आंबेरी देवली क्षेत्राची पाहणी करून अनधिकृत वाळू साठ्यावर कारवाई करावी.
संबंधित सरकारी कर्मचारी अनधिकृत व्यवसायाला कसा हातभार लावतात याचे मागे पुरावे भाजपने सादर केले होते. त्याअनुषंगाने संबंधित कर्मचार्‍यावर कारवाई झाली. यात चांगले सहकार्य मिळाले. यापुढेही असेच सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे अनधिकृत वाळू उपसा, वाहतुकीवर कारवाईसह अन्य महत्वाच्या विषयांवर कारवाईचे पाऊल न उचलल्यास गौणखनिज कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशाराही श्री. केनवडेकर यांनी दिला आहे.

\