कणकवलीकरांच्या आंदोलनाआधीच महामार्गाचे डांबरीकरण

2

धुळीच्या त्रासापासून मुक्तता कळशीतून रस्त्यावर पाणी ओतण्याचे आंदोलन स्थगित

कणकवली, ता.24 : कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर सिमेंट, खडीची प्रचंड धूळ उडत असल्याने वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले होते. महामार्ग ठेकेदाराला पाणी मारण्याचे आवाहन करून देखील टँकरच्या माध्यमातून पाणी आणले जात नव्हते. त्यामुळे संपूर्ण कणकवलीकरांनी ‘आम्ही कणकवलीकर’ या संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत आज महामार्गावर कळशीतून पाणी ओतण्याचा इशारा दिला होता. मात्र कणकवलीकरांच्या या आंदोलनापूर्वीच मध्यरात्री महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांची धुळीतून काहीशी मुक्तता झाली आहे. तर आम्ही कणकवलीकरांनीही आपले आंदोलन स्थगित केले आहे.
कणकवली शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तसेच उड्डाणपूल दुतर्फा असलेला सर्व्हिस रोडवर सिमेंट मिश्रित धुळीचा प्रचंड त्रास गेले आठ दिवस सुरू आहे. या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी महामार्गावर पाणी ओतावे असे आवाहन शहरवासीयांनी केले होते. मात्र ठेकेदाराने रस्त्यावर पाणी मारण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कणकवलीकरांनीच पुढाकार घेऊन, प्रत्येक घरातून एक कळशी पाणी आणून ते महामार्गावर ओतण्याचे निश्‍चित केले होते. सकाळी दहा पासून कणकवलीकरांची ही गांधीगिरी सुरू होणार होती. मात्र काही महिन्यापूर्वी आमदार नीतेश राणेंच्या चिखलफेक आंदोलनाचा धसका घेतलेल्या महामार्ग ठेकेदाराने काल रात्रीच पटवर्धन चौक ते एस.एम.हायस्कूलपर्यंतच्या मार्गाचे डांबरीकरण केले. तर पटवर्धन चौक ते गडनदीपुलापर्यंतचे डांबरीकरण पुढील दोन दिवसांत करण्याची ग्वाही दिली. या डांबरीकरणामुळे महामार्गावरील धुळीचा त्रास कमी झाला आहे.

33

4