वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
वैभववाडी/पंकज मोरे.ता,२४: वन्य प्राण्यांच्या अधिवासात मनुष्याने अतिक्रमण केल्यानंतर जंगले एका बाजूने उजाड होत चालली आहेत. त्यामुळे आता जंगलातील वन्यप्राणी मनुष्यवस्तीकडे बिनधास्तपणे वळू लागले आहेत. वैभववाडी तालुक्यातील कुर्ली पोवारवाडी येथे चार दिवसापूर्वी वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाली होते. दरम्यान बिबट्याचा सलग चार दिवस कुर्ली परिसरात वावर सुरू आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली राहत आहेत. तरी वन विभागाने मनुष्यवस्तीत वावरणा-या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
कुर्ली पोवारवाडी येथे गेल्या चार दिवसापूर्वी मोहन दत्ताराम पवार व पत्नी मनिषा मोहन पवार या वृद्ध दाम्पत्यांवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. सुदैवाने दोघांचेही प्राण वाचले. मात्र गेल्या चार दिवसापासून रात्रीच्यावेळी बिबट्याचा वावर होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येत आहे. दरम्यान पोवार दाम्पत्यांना वन विभागाने तातडीची ५ हजार रुपयाची मदत केली आहे. तरी वन विभागाने तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.