पोस्टर व्हायरल:सावंतवाडी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू
सावंतवाडी/शुभम धुरी ता.२४: विधानसभा निवडणुकीत राज्यात युती होणार,की नाही याबाबत चर्चा सुरू असताना सावंतवाडी मतदारसंघात भाजपातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांची निवडणुकीच्या तयारीची पोस्टर सोशल मीडियावर झळकत आहेत. यात “आमचं ठरलंय” असा उल्लेख आहे.त्यामुळे आगामी काळात तेली विधानसभा लढवतील हे मात्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.
राज्यात युती होईल की होणार नाही,याबाबत शिवसेना भाजपला जोरदार चर्चा रंगलेली आहे.अद्याप पर्यंत त्यावर निर्णय झालेला नाही.दोन्ही पक्षातील नेते तारखा पुढे ढकलत आहेत.या पार्श्वभूमीवर सावंतवाडी मतदारसंघातून भाजपमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले श्री.तेली आयत्यावेळी युती झाली,तर नेमकी कोणती भूमिका घेतील असे प्रश्न विचारले जात होते.मात्र श्री.तेली यांनी या प्रश्नाला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.सद्यस्थितीत सोशल मीडियावर “आमचं ठरलंय” असा संदेश देणारे त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांचा फोटो लावलेले बॅनर झळकत आहेत.त्यामुळे सद्यस्थितीत युती होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी,श्री.तेली यांनी मात्र केसरकरांच्या विरोधात दंड थोपटले दिसत आहेत.