रवींद्र चव्हाण; २० कोटीचा खर्च, शंभर वर्षे असणार आयुर्मान…
सिंधुदुर्गनगरी,ता.२५: मालवण-राजकोट येथे नव्याने तब्बल साठ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णा कृती पुतळा उभारला जाणार आहे. यासाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पुतळ्याचे आयुर्मान किमान शंभर वर्षे असणार आहे. गुजरात मध्ये होणाऱ्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निकषाच्या आधारावर हा पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. दरम्यान नव्याने उभारण्यात येणारा हा पुतळा संपूर्ण ब्रांझ या धातूंमध्ये असणार आहे. पुतळ्यासाठी संपूर्णपणे गंज रोधक स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार आहे तसेच शासनाकडून नेमण्यात आलेल्या तज्ञांकडूनच पुढील काम करून घेतले जाणार आहे आणि विशेष म्हणजे दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मालवण येथे पुन्हा छत्रपतींचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण यांनी ही माहिती दिली.
यावेळी ते पुढे म्हणाले, पुतळा पडण्याचे कारण आणि नवीन पुतळा कोणत्या पद्धतीने उभारावा यासाठी शासनाने दोन समित्या नियुक्त केल्या होत्या. या समितीत तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे समितीच्या सल्ल्यानुसार नवीन पुतळा उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने २० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे, असे सांगितले.