“फार्मासिस्ट ऑफ द इयर” पुरस्काराने अनंत देवस्थळींना सन्मानित…
सावंतवाडी ता.२५: फार्मसीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात विविध क्षेत्रात काम करण्याच्या मोठ्या संध्या उपलब्ध होऊ शकतात.त्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून आपला प्रवास सुरू ठेवला,तर यश खूप दूर नाही.असे प्रतिपादन ड्रगिस्ट अँड केमिस्टचे जिल्हाध्यक्ष आनंद रासम यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले.येथील यशवंतराव भोसले नॉलेज सिटीत जागतिक फार्मसिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सन २०१९ चा “फार्मासिस्ट ऑफ द इयर” हा पुरस्कार फार्मासिस्ट अनंत देवस्थळी यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सत्कारमूर्ती श्री.देवस्थळी बोलताना म्हणाले,सिंधुदुर्गच्या एका टोकाला असलेल्या खारेपाटण सारख्या ग्रामीण भागातील माझ्यासारख्या फार्मासिस्टचा शोध घेऊन हा सन्मान देणे,यापेक्षा माझ्यासाठी दुसरे कोणतेच भाग्य नाही.आमच्या आजोबांपासूनच्या पिढीने ९९ वर्षे घेतलेल्या परिश्रमाचा हा सन्मान आहे.त्यामुळे या प्रवासात आमच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह ग्राहकांचा सुद्धा तितकाच वाटा आहे.
ते पुढे म्हणाले आमच्या वडिलांनी दिलेल्या प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या शिकवणी मुळेच या सन्माना पर्यंत मी पोहोचू शकलो या सर्व प्रवासात आम्ही दानधर्म ला सुद्धा तितकेच योगदान दिले मात्र हे करत असताना उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नये हा नियतीने दिलेला मूलमंत्र सुद्धा आम्ही तितकाच जोपासला आहे
यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले,अध्यक्षा अस्मिता सावंत-भोसले,सचिव संजीव देसाई,विनायक दळवी,बी-फार्मसीचे प्राचार्य विजय जगताप,डी-फार्मसीचे प्राचार्य तुषार मकारी,सौ.देवस्थळी आदींसह मोठ्या संख्येने फार्मासिस्ट शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.