फोंडाघाट येथे महाश्रमदानाबाबत विशेष सभा संपन्न.

2

फोंडाघाट.ता,२५: जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जि.प सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत दि. 2 ऑक्टोंबर 2019 रोजी फोंडाघाट येथे महाश्रमदानाचे आयोजन करण्याबाबत फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या फोंडा ग्रामविकास अधिकारी मा.चंद्रकांत चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा संपन्न झाली.सदर सभेस सरपंच मा.संतोष आग्रे,अधिकारी,फोंडा महाविद्यालयाचे एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा.डॉ.बालाजी सुरवसे तलाठी मा.अर्जुन पंडित,ग्रा.पं.सदस्य,फोंडा केंद्रप्रमुख मा.सुर्यकांत चव्हाण,फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी ,बचतगटातील महिला, स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोंडा महाविद्यालयाचे एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा.डॉ.बालाजी सुरवसे यांनी प्लास्टिक चे पर्यावरणीय दुष्परिणामाविषयी माहिती देऊन अस्वच्छतेमुळे मानवाच्या व प्राण्यांच्या आरोग्यावर तसेच कुटुंबाच्या व ग्रामपंचायतीच्या अर्थकारणावर कसा दुष्परिणाम होतो याविषयी मार्गदर्शन केले.फोंडा तलाठी मा.अर्जुन पंडीत यांनीही यावेळी मतदान जनजागृतीबाबत व स्वच्छतेविषयी आपले विचार मांडले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी जास्तीत जास्त मतदान व्हावे व मतदान जनजागृतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

फोंडा ग्रामविकास अधिकारी मा.चंद्रकांत चौलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘पिक अप प्लास्टिक डे’ व महाश्रमदानाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की,सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी फोंडाघाट येथे जनजागरण फेरी काढण्यात येणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. ‘पिक अप प्लास्टिक डे’ च्या दिवशी प्लास्टिक च्या 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या व जास्त जाडीच्या पिशव्या, मल्टीलेअर प्लास्टिक, पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक चे तेलाचे कॅन व पिशव्या, औषधे व कीटकनाशकांचे प्लास्टिकचे कॅन व पिशव्या अशा प्रकारे वर्गीकरण फोंडा परिसरात करण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत समर इंटर्नशिप अभियानात फोंडाघाट महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागास सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल फोंडाघाट महाविद्यालयाचे अभिनंदन करण्यात आले.

4

4