विद्यार्थ्यांना माझं मुल म्हणून शिकविणारा शिक्षकच ‘आदर्श शिक्षक‘

2

प्रा.नांदोस्कर : वेंगुर्ले नगरवाचनालयचे आदर्श पुरस्कारांचे वितरण

वेंगुर्ले.ता.२५:
विद्यार्थी हा माझं मुल आहे या भावनेने जेव्हा शिक्षक ज्ञानदान करतो तेव्हाच तो आदर्श शिक्षक ठरतो. अशा शिक्षकांना व शाळांना प्रेरणा देण्याचे कार्य वेंगुर्ला नगरवाचनालय करीत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जे.जे.स्कूल ऑफ ऑर्टस् मुंबईचे निवृत्त प्राध्यापक सुनिल नांदोस्कर यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
वेंगुर्ले येथील नगरवाचनालय या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक- शिक्षिका, आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण प्रा. सुनिल नांदोस्कर यांच्या हस्ते नगरवाचनालयाच्या लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. सूर्यकांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परुळेकर, कार्यकारी सदस्य सुमन परब, सुशिला खानोलकर, सत्यवान पेडणेकर, वीरधवल परब, केंद्रप्रमुख तांबे, प्राजक्ता आपटे यांच्यासह बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, रोटरी क्लबचे पदाधिकारी, मठ गावचे ग्रामस्थ, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मेघःश्याम रामकृष्ण गाडेकर स्मृती ‘आदर्श शिक्षक पुरस्कार‘ मठ शाळा नं.२चे शिक्षक चंद्रकांत सावंत यांना, जानकीबाई मे. गाडेकर आदर्श शिक्षक पुरस्कार नवाबाग शाळेचे रामा पोळजी यांना, सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती ‘आदर्श शिक्षक पुरस्कार‘ (माध्यमिक विभाग) अणसूर पाल हायस्कूलचे राजेश घाटवळ यांना तसेच सौ. गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती ‘आदर्श शाळा पुरस्कार‘ मठ येथील कणकेवाडी शाळा नं.३ या शाळेला देऊन गौरविण्यात आले. शाळा नं.३चा पुरस्कार मुख्याध्यापक चित्रा प्रभूखानोलकर यांनी स्विकारला. शिक्षकांनी आपल्या मुलांप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठीही कष्ट घेऊन प्रत्येक क्षेत्रात वेगळा विचार, वेगळी क्रांती घडविली पाहिजे असे अॅड.प्रभूखानोलकर यांनी तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा चांगल्या पद्धतीने चालवून विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेण्याचे काम केले, अशांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे हे संस्थेचे ध्येय असल्याचे मत कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्यवाह कैवल्य पवार यांनी तर आभार कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी मानले.

1

4