सिंधुदुर्गला मासिक पाळी व्यवस्थापन माहिती सादर करण्याचा मान…

2

बारा राज्यातील वरिष्ठ प्रतिनिधीची उपस्थिती; सीईओंनी केले सादरिकरण…

सिंधुदुर्गनगरी ता.२५: देशात मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम सर्वोत्कृष्ट राबविलेल्या बारा राज्यांना माहिती सादर करण्यासाठी यूनिसेफ या जागतिक संघटनेने 24 सप्टेंबर रोजी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात महाराष्ट्र राज्याचा समावेश होता. महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम सर्वात यशस्वी राबविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ही माहिती सादर करण्याचा मान यूनिसेफने दिला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी ही जबाबदारी निभावली.
यूनिसेफ या जागतिक दर्जाची संघटना पाणी, आरोग्य, माहिलांचे आरोग्य या विषयात लक्षवेधी काम करीत आहे. याच संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर ‘अस्मिता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील अनेक जिल्हे सहभागी झालेले आहेत. नवी दिल्ली येथील कंस्टीट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे 24 सप्टेंबर रोजी यूनिसेफने एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात देशातील बारा राज्यातील प्रधान सचिव सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक राज्यांच्या प्रतिनिधिंनी मासिक पाळी व्यवस्थापनमध्ये केलेले काम, यासाठी राबविलेले उपक्रम, तसेच या उपक्रमाची पुढील दिशा व त्यासाठीचे नियोजन विशद केले. महाराष्ट्र शासनाने ही माहिती सादर करण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला दिला होता. या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने के मंजूलक्ष्मी यांनी ही माहिती उत्कृष्ट प्रकारे सादर केली. त्यांना याच उपक्रमात चांगले काम करणाऱ्या डॉ शोभा खांदारे यांची साथ लाभली.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा परिषदेच्या पाच विभागांना एकत्र करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 सप्टेंबर 2016 रोजी मासिक पाळी व्यवस्थापनसाठी ‘उत्कर्षा’ या उपक्रमाचा प्रारंभ केला होता. यात पाणी पुरवठा, स्वच्छ्ता, शिक्षण, आरोग्य, महिला व बाल कल्याण हे पाच विभाग सहभागी आहेत. यूनिसेफ हा संस्थेच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील 19 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी जिल्ह्यातील शाळा, हायस्कूल, महाविद्यालयात मासिक पाळीबाबत समज-गैरसमज याविषयी उहापोह करण्यात आला. यासाठी जिल्ह्यात चळवळ उभी राहिली.
याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने याच धर्तीवर ‘अस्मिता’ हा उपक्रम सुरु केला. यासाठी काढलेल्या आदेशात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने राबविलेल्या उपक्रमाप्रमाणे ‘अस्मिता’ अभियान राबवायचे असल्याचे विशेष नमूद केले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यात मुलींसाठी हा उपक्रम सुरु झाला. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा यात आघाडीवर असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ‘उत्कर्षा प्लस’ हा उपक्रम 26 नोव्हेंबर 2018 रोजी सुरु केला. यासाठी जिल्ह्यातील महिलांचा रॅण्डम पद्धतीने सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत जिल्ह्यातील महिलांच्या मासिक पाळीतील समस्या अवलोकन करण्यात आल्या. त्यानुसार उपक्रमांचे नियोजन करून ते राबविण्यात येत आहेत. त्याचीच दखल घेत यूनिसेफने दिल्ली येथील कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याला सादरिकरण करण्याची संधी दिली. जिल्हा परिषदेने 26 जानेवारी 2019 रोजी प्रत्येक गावात शासकीय हळदीकुंकू कार्यक्रम राबवित सॅनिटरी नॅपकिनचे वाटप जिल्हा स्वच्छ्ता विभागाच्यावतीने करण्यात आले होते. हा उपक्रम राज्यात लक्षवेधी ठरला होता.

11

4