कुडाळ,ता.०१: तालुक्यातील आंबडपाल येथील जिल्हा परिषद शाळेने राज्यस्तरीय परसबाग स्पर्धेत राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला असून शाळेला २१ हजाराचे बक्षीस देखील प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत तब्बल ३५ जिल्ह्यांचा समावेश होता.
पुणे येथे आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाळेला गौरविण्यात आले. यावेळी प्रधान सचिव आय. ए. कुंदन, अर्चना अवस्थी, सहसचिव आर. विमला, आयुक्त सूरज मांढरे , संचालक राहुल रेखावार, योगेश सोनवणे आदींसह आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री, कृषी व शिक्षण तज्ज्ञ तानाजी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश तानिवडे, महेश नाईक, शाळेचे मुख्याध्यापक संजय बगळे आदी उपस्थित होते.
दरम्यान परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे. ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे यासारखे हेतू या उपक्रमामुळे साध्य झाले.