पवारांना नोटीस बजावणे हा रडीचा डाव…..

2

वेंगुर्ला राष्ट्रवादीकडून निषेध: जनाधार मिळत असल्यामुळे ईडीची नोटीस….

वेंगुर्ले : ता.२५

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा राज्याचे नेते शरद पवार यांना मिळणारा जनाधार लक्षात घेता आपला पराभव निश्चित आहे.याचा अंदाज सत्ताधा-यांना आला त्यामुळे केवळ रडीचा डाव म्हणून ईडीने त्यांना नोटीस बजावली आहे. या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत अशी भूमिका वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मांडण्यात आली आहे. पवारां सारख्या नेत्यावर अशा चुकीच्या पद्धतीने आरोप होणे वेदना देणारे आहे असेही त्यांनी म्हटले याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
वेंगुर्लेत पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रांतिक सदस्य एम के गावडे, सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष धर्मजी बागकर, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, युवक अध्यक्ष रोहन वराडकर, तालुका उपाध्यक्ष योगेश कुबल यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. पत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य बँकेच्या आजी माजी ७० संचालकांना इडीची नोटीस आली आहे व त्यामध्ये शरद पवार यांचे नाव आहे. वास्तविक पवार हे बँकेचे संचालक नसताना यांचे नाव यात असणे चुकीचे असून फक्त त्यांना महाराष्ट्रात मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचे एकमेव कारण आहे. यापूर्वी १९९२ ते १९९५ ला पवार मुख्यमंत्री असताना एनरॉन समुद्रात बुडविणार, दाऊदच्या मुसक्या बांधून आणणार यासारखे अनेक आरोप त्यांच्यावर झाले. मात्र त्यापैकी एकही आरोप सिद्ध झाला नाही. महाराष्ट्र राज्यातील जनता सुज्ञ आहे. कितीही अपप्रचार केला तरी पुन्हा २०१४ होणार नाही. २०१९ चे जनतेचे निर्णय विचार करायला लावणारे असतील. ५ वर्षात कोणताही विकास झाला नसल्याने त्यांना आता यात्रा काढाव्या लागत आहेत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ३७० कलम व सर्जिकल स्ट्राईक याचा आधार घ्यावा लागतो. नंतर पुलवामा हल्ल्यात ४० निरपराध सैनिकांचा बळी गेला. त्याबाबत बोलत नाहीत. चांगल्या निर्णयाचे देशाने नेहमीच स्वागत केले. मात्र देशाच्या आंरक्षणाच्या गंभीर प्रश्नावर महाराष्ट्रात मतांचा जोगवा मागणे चुकीचे आहे. यामुळे देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांना बदनाम करणाऱ्या षडयंत्राचा आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जाहीर निषेध करतो. याची किंमत सरकारला नक्की मोजावी लागेल असे नमूद करण्यात आले आहे.

2

4