राष्ट्रवादी अर्चना घारेंना संधी देणार का…?

2

सावंतवाडी विधानसभा; साळगावकर ,गावडेंची नावे चर्चेत…

सावंतवाडी/शुभम धुरी ता.२६: आयत्यावेळी पक्षाला सोडचिठ्ठी देणा-या “गयाराम” मुळे अडचणीत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत नवोदित चेहऱ्यांना संधी देण्याचा वेगळा उपक्रम राबवला जात आहे.या पार्श्वभूमीवर सावंतवाडी मतदारसंघातून इच्छुक असलेल्या व पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या अर्चना घारे यांना याठिकाणी संधी देण्यात येणार का ? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.दुसरीकडे या मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येवून
नगराध्यक्ष झालेले बबन साळगावकर राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत,तर वेंगुर्ल्यात एक.के.गावडे यांनी दंड थोपटले आहेत.त्यामुळे या तीन इच्छुकात तिकिटाची लॉटरी कोणाला लागते हे चित्र स्पष्ट होण्यासाठी काही वेळ आता वाट पाहावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस कडून नवी खेळी खेळली जात आहे.यात पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या नेत्यांवर मात करत प्रामुख्याने नवख्या व महिला उमेदवारांना संधी देण्याचा पक्षाचा मानस आहे.याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून पक्षाच्या निरीक्षका अर्चना घारेंना उमेदवारी मिळेल का ? अशी कुजबूज सध्या सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून पक्षांतर होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात पक्ष हादरून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्याकडून नवखे व युवती उमेदवारांचे चेहरे पुढे आणण्याची राजकीय खेळी सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी उस्मानाबाद मतदारसंघात राणा रणजीतसिंग पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची जोरदार तयारी सुरू केले आहे.तर जळगाव मध्ये सेनेच्या गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पिता पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुद्धा राज्याच्या राजकारणातील खेळी राष्ट्रवादी खेळेल का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

12

4