महिलांना सन्मान दिल्यास आमचा सन्मान:निश्चीतच आपण विजयी होवू
वेंगुर्ले.ता.२६:
गेल्या ५२ वर्षात वेंगुर्ला-कुडाळ व आताच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघात महिला उमेदवारांना विधानसभेची उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे भाजपाने संधी दिल्यास ही विधानसभा निवडणुक लढविण्यास मी इच्छूक आहे.असे मत भाजपाच्या जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल यांनी मांडले आहे.
भाजपाने गेल्या लोकसभा निवडणूकीत ४५ महिला उमेदवारांना संधी दीली. आता आपण उमेदवारीसाठी मुलाखत दीली आहे. पक्षाची उमेदवारी मिळाली तर निश्चित आपल्याला यश मिळेल असा दावा त्यांनी केला आहे.
कुबल यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या ध्येय धोरणानुसार महिलांचा सन्मान जसा लोकसभा निवडणुकित उमेदवारीचे ४५ तिकीटे देऊन करण्यात आला, तशाच प्रकारे विधानसभा निवडणुकित महिलांना तिकीट देण्याचे संकेत महिलांत निर्माण झाले आहेत. म्हणूनच यावेळी सावंतवाडी मतदार संघात तीन महिला उमेदवारांनी आपली उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. यात सिंधुदुर्ग जिह्यात भाजपा महिला जिल्हाध्यक्ष या नात्याने आपणही उमेदवारी मागितली आहे. कारण २००१ मध्ये वेंगुर्ला नगरपरीषदेत नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर विविध विकासकामे त्या माध्यमातून करीत समाजकारण केलेले आहे. तसेच क्रांती महिला संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब महिलांची प्रशासनाकडील कामे, त्यांच्या विकासाच्यादृष्टीने शासकिय योजनाचे लाभ आपण मिळवून दिलेले आहेत. रक्षाबंधन निमित्ताने मुख्यमंत्र्यांसाठी रक्षाबंधन पर्व अंतर्गत महिला शक्ती केंद्राच्या माध्यमातून जिह्यात राबविलेल्या कार्यक्रमात महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी राबविलेल्या महिलांसाठीच्या विविध योजनाचा लाभ महिला वर्गाने घेतलेला आहे. त्यामुळे महिला वर्ग भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर खुष आहे. म्हणूनच सावंतवाडी मतदार संघात जर आपणास उमेदवारी मिळाल्यास निश्चितच भाजपास यश मिळेल व महिलांचा सन्मानही राखला जाईल. दरम्यान जरी महिलांची मागणी असली तरी सुध्दा भाजपाचे वरीष्ठ पदाधिकारी सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहून त्यास निवडून आणण्याचे प्रयत्न पक्ष संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.