सिंधुदुर्गनगरी,ता.26
विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे कणकवली विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांनी सांगितले. निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कणकवली वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उमेदवारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली.
उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे आहेत. उमेदवारांने निवडणूक आयोगाने दिलेल्या नमुना 2 ब मध्ये अर्ज करावा, अर्जातील सर्व रकाने भरलेले असावेत, नामनिर्देशन पत्रामध्ये दिलेल्या संख्येएवेढ्या प्रस्ताविकांनी स्वाक्षरी केली असावी, दोन पेक्षा जास्त विधानसभा मतदार संघातून अर्ज भरू नयेत. एका उमेदवारास जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, चार पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नमुना 26 मध्ये विहित नमुन्यातील पब्लिक नोटरी, प्रथम दंडाधिकारी, ओथ मॅजिस्ट्रेट यांच्या समोर केलेले शंभर रुपयांच्या मुद्रांकावरील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे, त्यामधील सर्व रकाने भरले असल्याची खात्री करावी, ज्या रकान्यातील माहिती लागू नाही, तेथे लागू नाही, निरंक, माहित नाही असे नमुद करावे, कोणताही रकाना कोरा ठेवल्यास व सूचना देऊनही नवीन प्रतिज्ञापत्र विहित कालमर्यादेत दाखल न केल्यास नामनिर्देशन पत्र नाकारले जाईल, याची नोंद घ्यावी, नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून स्वाक्षरी करणारी व्यक्ती संबंधित मतदार संघातील असणे आवश्यक आहे. सूचक अशिक्षित असल्यास त्याच्या घ्यावयाचा आंगठा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष लावावा, मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये एक सूचक असणे आवश्यक आहे. इतर सर्व उमेदवारांच्या बाबतीत 10 सूचक असणे आवश्यक आहे. अन्य मतदार संघातील उमेदवाराने त्यांच्या अर्जासोबत तो मतदार असलेल्या मतदार यादी भागाची प्रमाणित प्रत सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांने 10 हजार रुपये अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. अनु. जाती, अनु. जमाती उमेदवाराच्या बाबत जात प्रमाणपत्र सादर केल्यास पाच हजार इतकी अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराने विहित नमुन्यातील नमुना अ व ब मधील प्रमाणपत्र मूळ प्रतीत सादर करणे आवश्यक राहील. नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केले नसल्यास सदर प्रती नामनिर्देशन पत्र दाखल करणेचे शेवटच्या दिवशी दुपारी 3.00 वाजे पर्यंत सादर करावेत. नामनिर्देशन पत्रासोबत 2 सें.मी. रुंदीचे व 2.5 सें.मी. उंचीचे लगतच्या तीन महिन्यातील पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेले चार फोटो जोडावेत, फोटोच्या मागे उमेदवाराने स्वाक्षरी करावी, फोटो सोबत विहित नमुन्यातील घोषणापत्र सादर करावे, फोटो सामान्य कपड्यातील असावा, गणवेशातील फोटोस परवानगी देण्यात येणार नाही, टोपी, काळा चष्मा टाळावा, नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या किमान एक दिवस आधी उमेदवाराने नवीन बँक खाते उघडावे व त्याचा तपशील लिखित स्वरुपात खाते पुस्तकाच्या झेरॉक्ससह सादर करावा, उमेदवारास त्याच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च सदर खात्यातून करणे आवश्यक राहील. नामनिर्देशन पत्र सादर केल्यानंतर उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर शपथ घेणे आवश्यक आहे. उमेदवार निवडणूक कामासाठी निवडणूक प्रतिनिधींची नेमणूक करु शकतात. उमेदवाराने व निवडणूक प्रतिनिधी यांनी नमुना स्वाक्षरी सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात जास्तीत जास्त 3 वाहने व उमेदवारासह 5 व्यक्ती यांना प्रवेश करता येईल. नामनिर्देशन पत्र दाखल करताना आणलेली वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यांवर होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरणे बंधनकारक राहील.