आशियाई बँकेच्या माध्यमातून ४१७.३७ कोटींचा निधी ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ..
कणकवली, ता. १० : विजयदुर्ग ते कासार्डे या रस्त्याचे दुपदीकरण आणि क्राँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ उद्या ११ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. या रस्त्यासाठी आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्य योजनेतून ४१७ काेटी ३७ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
या रस्ता कामाच्या शुभारंभावेळी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, बांधकामच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, बांधकामचचे सचिव सदाशिव साळुंखे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मु्ख्य अभियंता शरद राजभोग, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आदी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे तिठा ते विजयदुर्ग किल्ला असा एकूण ५२ किलोमिटर लांबीचा मार्ग सध्या साडेपाच मिटर रूंदीचा आहे. हा मार्ग आता सात मिटरचा होणार आहे. यात ७ पुलांची नव्याने बांधणी, रस्त्याला संरक्षक भिंत तसेच २४२ मोऱ्यांची बांधकामे होणार आहेत. ठेेकेदाराने दोन वर्षे हे काम करावयाचे आहे. तर १० वर्षे देखभाल दुरूस्ती करायची आहे. पुढील ३० वर्षे टिकेल असे या रस्त्याचे डिझाईन करण्यात आल्याची माहिती बांधकामकडून देण्यात आली.