दीपक केसरकरांची घोषणा; शिरशिंगे धरणाचा प्रश्न मार्गी, साडे सहाशे कोटी मंजूर…
सावंतवाडी,ता.१०: मतदार संघातील लोकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी लवकरच सावंतवाडी शहरात प्रतिशिर्डी साई मंदिर उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. दरम्यान शिरशिंगे धरणासाठी साडे सहाशे कोटी रुपये आज मंजूर झाले असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. त्याच बरोबर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न नक्कीच सुटेल, असे त्यांनी सांगितले.
श्री. केसरकर यांच्या नव्या कार्यालयाचे आज साईंची शिर्डीत असलेली प्रतिमा बसविण्यात आली आहे. याची विधीवत पुजा आज केसरकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आज मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत शिरशिंगे धरण प्रकल्पाचा तिढा सुटला आहे. आता या धरणाचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी साडे सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे पंचक्रोशीतील गावे ओलिताखाली येणार आहे तसेच माडखोल, माजगाव अशा अन्य १० लघु धरणांची कामे मार्गी लावली आहेत.