कावळेसाद मारहाणप्रकरणी नऊ जणांना चार दिवसाची पोलीस कोठडी

2

सावंतवाडी,ता.२६ : आंबोली-कावळेसाद येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या मालवण-सुकळवाड येथील ५ युवकांना मारहाण करून त्यांची लूट केल्या प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या वेळगाव-कर्नाटक येथील ९ संशयितांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यालायने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. ३ जुलै रोजी किरकोळ कारणावरून दोन गटात हा वाद झाला होता.दरम्यान अधिक तपासानंतर संबंधित नऊ जणांना काल सकाळी सावंतवाडीत पोलिसांनी अटक केली होती.त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
मालवण-सुकळवड येथील पाच युवक ३ जुलै रोजी आंबोली कावळेसाद येथे वर्षा पर्यटनासाठी गेले होते.यावेळी किरकोळ कारणावरून बेळगाव येथून आलेल्या युवकांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.या दोन गटात झालेल्या झटापटीत अंगावरील सोन्याचे दागिने लुटून तब्बल साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल संशयित युवकांनी लंपास केला होता. ३ जुलै रोजी ही घटना घडली होती.या मारहाणीच्या घटनेनंतर संशयितांनी मालवण मधील युवकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत घटनास्थळीवरून पलायन केले होते.या संशयित युवकांनी सोबत आणलेल्या मिनी बस चा फोटो काढल्यामुळे त्या बस च्या नंबर वरून हे युवक बेळगाव कर्नाटक येथील असल्याचे निष्पन्न झाले होते.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात बेळगाव येथील युवकांवर दागिने चोरून नेल्याप्रकरर्णी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या युवकांच्या शोधासाठी सावंतवाडी पोलीस सलग तीन वेळा बेळगाव येथे गेले होते. कर्नाटक बेळगाव येथील आर टी ओ विभागातून युवकांनी सोबत आणलेल्या बस चा नंबर वरून गाडी मालकाचा शोध पोलिसांनी घेतला. त्या बसचा शोध लागल्यानंतर या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या युवकां पर्यत पोहचण्यात सावंतवाडी पोलीस यशस्वी झाले. मारहाण प्रकरणात सहभाग असलेल्या बेळगाव शिवबसवनगर येथील युवकांचा ठावठिकान पोलिसांनी शोधून काढत त्यांच्या पालकांची भेट घेतली. मात्र प्रारंभी त्याच्या पालकांनी आपल्या मुलांचा सहभाग या गुन्ह्यात नसल्याचे सांगत हात वर केले. अखेरीस पोलिसी हिसका दाखवताच युवकांची खरे नावे निष्पन्न झाली. त्या युवकांच्या पालकांनी काही दिवसानंतर सावंतवाडी पोलीस ठाणे गाठत गुन्ह्यात चोरीस गेलेले दागिने परत पोलिसांच्या स्वाधीन केले. व या गुन्ह्यातून मुलांना वाचवण्याची मागणी केली होती.
अखेरीस गेली अडीच महिने फरारी असलेल्या बेळगाव येथील युवक स्वतः बुधवारी पोलीस ठाण्यात हजर झाले. यातील संशयितांची नावे महेंद्र मचिंद्र चौगुले, चरण निर्मल लोंढे, सनी श्रवण लोंढे, साईनाथ बिसू लोंढे, किशन कदम लोंढे, अजय संजय लोंढे, प्रेम जयपाल लोंढे, अल्ताफ अनिल चौगुले, अजय अंजीत लोंढे सर्व रा कर्नाटक बेळगाव शिवबसवनगर असे आहे. या संशयितांची ओळख पटावी यासाठी मालवण येथील युवकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. या सर्व संशयितांना पोलिसांनी काल अटक केली होती दरम्यान त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

9

4